ग्वादलूप : कॅरिबियनमधील लेसर अँटिलीसच्या लीवर्ड द्वीपसमूहापैकी बेटे व फ्रान्सचा सागरपार प्रांत. क्षेत्रफळ १,७०२ चौ. किमी. लोकसंख्या ३,३७,९०० (१९७२). यांत १६° १५’ उ. व ६१° ३५’ प. वरील पूर्वेचे ग्रांद तेअर (५६६ चौ. किमी.) आणि पश्चिमेस बास तेअर (९४० चौ. किमी.) ही रिव्ह्येर साले या खाडीने विभागालेली जोडबेटे प्रमुख असून त्यांशिवाय २५ किमी. परिसरातील पेती तेअर, देझराद, मारीगालांत व लेसँत आणि सु. २००–२५० किमी.वरील बार्तेलमी व सँ मार्तेचा उत्तर भाग यांचाही ग्वादलूपमध्ये समावेश होतो. बास तेअर ज्वालामुखी बेट असून त्यावरील सूफ्रीएअर हे १,४८४ मी. उंचीचे शिखर लेसर अँटिलीसमध्ये सर्वांत उंच आहे. येथे उष्णोदकाचे झरेही आहेत. बार्तेलमी व ले सँत ही ज्वालामुखीजन्य आहेत. बाकीची सर्व चुनखडकयुक्त असून ग्रांद तेअरची कमाल उंची फक्त १४५ मी. आहे. ग्वादलूपचे उष्ण व दमट हवामान व्यापारी वाऱ्यांमुळे सुसह्य झाले आहे. उंचीप्रमाणे सरासरी तपमान २३° से. ते ३१° से. असते. पर्जन्यमान ग्रांद तेअरमध्ये ११४ सेंमी. व बास तेअरमध्ये २५० सेंमी. पेक्षा अधिक असते. कमाल ९९८ सेंमी.ची नोंद आहे. येथील पिकांना चक्रीवादळांचा धोका असतो. पश्चिमेकडे दाट अरण्ये असून पूर्वेकडे शेतीचा विकास झालेला आहे. खाडीच्या दोन्ही बाजूंस खारकच्छ वनस्पती आहेत. मूळचे प्राणी व पक्षी नष्टप्राय झाले आहेत.

येथील मुख्य उत्पादन उसाचे असून साखर, मळी व रम यांबरोबरच केळी, व्हॅनिला, कोकोबिया, अननस व कॉफी यांचीही निर्यात मुख्यतः फ्रान्सला होते. एकूण पशुधन १९६८ मध्ये १,३१,२०० होते.

येथे निग्रो व मिश्रवंशीय बहुसंख्य असले, तरी काही लहान बेटांवर गोरे अधिक आहेत. फ्रेंच अधिकृत भाषा असली, तरी स्थानिक भाषा प्रचलित आहे. बास तेअरवरील बास तेअर [लोकसंख्या १५,८३३ (१९७२)] ही राजधानी असून ग्रांद तेअरवरील प्वांत-आ-पीत्र [लोकसंख्या २९,७५७ (१९६७)] हे सर्वांत मोठे शहर व मुख्य बंदर आहे. शिक्षण सार्वत्रिक व मोफत असून १९६९ मध्ये प्राथमिक शाळांत ७४,११६ व माध्यमिक आणि इतर उच्च शिक्षणसंस्थांत एकूण ११,८१३ विद्यार्थी शिकत होते. १९७१ मध्ये ३१२ दवाखाने १७ चिकित्सालये व ११ रुग्णालये आणि त्यांत ४,१४५ खाटांची सोय होती. १९७० मध्ये ३२३ किमी. राष्ट्रीय मार्ग १,३७३ किमी. इतर मार्ग होते आणि एकूण मोटारवाहने २७,१९९ होती. लोहमार्ग नाहीत. आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. १९७१ मध्ये १४,३७४ दूरध्वनी व १९७३ मध्ये २०,९८५ रेडिओ संच व ११,१७१ दूरचित्रवाणी संच होते. दररोज १६ तास फ्रेंचमधून रेडिओ प्रक्षेपण आणि आठवड्यातून २५ तास दूरचित्रवाणी प्रक्षेपण होते. सुंदर पुळणी, गरम पाण्याचे झरे व आकर्षक सृष्टिसौंदर्य यांमुळे पर्यटन व्यवसाय वाढत आहे.

कोलंबसने १४९३ मध्ये या बेटांचा शोध लावून त्यांस सांता मारिया दे ला ग्वादलूप या स्पॅनिश मठाचे नाव दिले. १६३५ मध्ये फ्रेंचांनी येऊन येथील कॅरिब इंडियनांना हळूहळू नष्टप्राय करून व आफ्रिकेतून गुलाम आणून १६४७ मध्ये पहिला साखर कारखाना उभारला. सप्तवार्षिक युद्धात (१७५६–६३) व फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात ही बेटे ब्रिटिशांनी घेतली होती. क्रांतिसैन्याने ब्रिटिशांना हुसकावून लावून गुलामगिरी नष्ट केली परंतु गिलोटीन उभारून दहशतीचे राज्य सुरू केले. १७९४ पर्यंत गव्हर्नर जनरलकडे आणि नंतर १९४६ पर्यंत याचा वेगळा कारभार होता. दुसऱ्या महायुद्धात ग्वादलूपने द गॉलला पाठिंबा दिला. त्यानंतर त्याला सागरपार प्रांताचा दर्जा मिळाला. फ्रान्सने नेमलेला प्रमुख ३६ निर्वाचित सदस्यांच्या साहाय्याने येथील कारभार पाहतो. फ्रेंच नॅशनल असेंब्लीवर ग्वादलूपचे तीन डेप्युटी, सिनेटवर दोन प्रतिनिधी व इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सलवर एक प्रतिनिधी असतो.    

            

     कांबळे, य. रा.