उरल : यूरोप आणि आशिया खंडांच्या परंपरागत सीमेवरील मुख्यत्वे उत्तर-दक्षिण पसरलेली पर्वतश्रेणी. लांबी सु. २,१०० किमी. उत्तरेकडे आर्क्टिकपर्यंत व दक्षिणेकडे जवळजवळ अरल समुद्रापर्यंत पसरलेल्या या पर्वतरांगांचे काही उतार वायव्येकडे व काही ईशान्येकडे असले, तरी प्रमुख रांगा मात्र उत्तर-दक्षिणच आहेत व त्यांचे उतार पूर्व-पश्चिम आढळून येतात. पश्चिमेकडे पूर्व यूरोपातील पेचोराव्होल्गा खोऱ्यांचा विस्तृत सखल प्रदेश आणि पूर्वेकडे आशियातील पश्चिम सायबीरियाचा ओब-इर्तिश खोऱ्यांचा मैदानी प्रदेश अशी विभागणी या पर्वत श्रेणीमुळे झाली आहे. इतर घडीचे पर्वत या दोन्ही खंडांत वक्राकार पसरलेले आढळतात उरल पर्वतश्रेणीमध्ये मात्र फक्त उत्तरेकडील, पुढे वायगाश व नॉव्हाया झीमल्या बेटांत जाणारा पैरवोय पर्वताचा विस्तार वक्राकार आहे. ६० पूर्व रेखांशावरील ही सरळ पर्वतश्रेणी हर्सीनियन काळातील वलीकरणाने बनलेली असावी. नंतर या काळातील बरेचसे भूविशेष क्षरणामुळे स्थलीप्राय अवस्थेला पोहोचले काही भाग पुनश्च उत्थान पावला असून काही ठिकाणी विभंगक्रियाही झालेली दिसते. विशेषतः अतिउत्तर उरल प्रदेशात व अगदी दक्षिण उरल प्रदेशात भूरचना गुंतागुंतीची झाली असून झीजकार्यामुळे समजण्यास कठीण झाली आहे. उरलची सर्वसाधारण उंची सु. २५० ते ९०० मी. असली, तरी काही ठिकाणी ती १,५०० मी. पेक्षाही अधिक आढळते. उत्तरेकडे रुंदी सु. ८० किमी. असून दक्षिणेकडे सु. २२५ किमी. आहे. सर्वसामान्यपणे पुराजीव महाकल्पातील स्तर येथे विशेषेकरून आढळतात. परंतु रूपांतरित व अग्निजन्य प्रकारचे निरनिराळ्या काळातील स्तर मध्य श्रेणीतील भागात आढळतात. उरल तौ हे एक याचे उत्तम उदाहरण दाखविता येईल. अलीकडील तृतीयक काळातील सागरी गाळ पश्चिम सायबीरियाच्या सखल प्रदेशात आढळतो, पण पश्चिम कडा हा मुख्यत्वे पर्मीयन, हर्सीनियन भू-हालचालींचेवेळी व कार्‌बॉनिफेरस काळाचे शेवटी, या पर्वतश्रेणींना पडलेल्या घड्यांमुळे, निर्माण झाला असावा. परंतु तृतीयक काळात यातूनच स्थलीप्रायभूमीची निर्मिती झाली व सरतेशेवटी त्या काळाच्या उत्तरार्धात भूभाग उंचावण्यामुळे नवीन झीजकार्य सुरू होऊन हा प्रदेश भूशास्त्रदृष्ट्या अगदी अनाकलनीय झाला. त्यातच मध्यजीव काळातील विभंगामुळे व प्रणोद विभंगामुळे नवीन भूविशेष अस्तित्वात आले. या सर्व घडामोडींमुळे व या पर्वतश्रेणीच्या जुनेपणामुळे येथे अनेक खनिजद्रव्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.

उरल पर्वताच्या एकापाठोपाठ असलेल्या कमी उंचीच्या परंतु समांतर रांगा रचनेच्या बाबतीत असमान आढळतात व हळूहळू पश्चिमेकडील मैदानी प्रदेशातून वर येत जलविभाजनक्षेत्रापर्यंत उंची गाठून पूर्वेकडे सायबीरियाच्या सखल प्रदेशाकडे एकदम उतार दर्शवितात. मध्य पर्वतश्रेणीतील प्रदेश कमी उंचीचा आढळतो. ते उफाजवळ थोडा वक्राकार असून स्तरित व सिलूरियन खडकांचा व अधूनमधून कोळसा आणि क्षार तसेच बॉक्साइट यांनी युक्त आहे. या पर्वतश्रेणीपासून पुढे मधल्या उंच पर्वतश्रेणीपर्यंत सातत्याने उंची वाढत गेली आहे. पूर्वेकडे मात्र घड्यांची तीव्रता जास्तच भासते. क्रिस्टलाइन शिस्टचा पट्टा या उंच शिखरे असणाऱ्या पर्वतश्रेणीत दिसतो. हाच प्रदेश जलविभाजनश्रेत्र म्हणून ओळखला जातो. जलविभाजनश्रेत्राच्या पूर्वेकडे आत घुसलेले अवजड अग्निजन्य दगड आढळतात. याच विभागात अनेक औद्योगिक वसाहती आहेत कारण अशा प्रकारचा दगड हा खनिज द्रव्यांनी युक्त असतो. मध्यभागात अनेक सोपे सरळ रेल्वे मार्ग आहेत. उत्तरेकडील भागात सापडणाऱ्या गाब्रो द्रव्यात ड्यूनाइटमिश्रित प्लॅटिनम आढळते. याच विभागात अतिपूर्वेकडील भागात सिलूरियन ते कार्‌बॉनिफेरस काळातील आणखी काही अग्निजन्य खडक आढळतात. पुढे ते ओब नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरलेले आहेत. उरल पर्वताचे ६८ ३०उ. ते ६१उ. पर्यंतचा उत्तर उरल, ६१उ. ते ५५उ. पर्यंतचा मध्य उरल व ५५उ. ते ५१उ. पर्यंतचा दक्षिण उरल असे तीन भाग पडतात.

उत्तर उरल: या भागात उरल पर्वतश्रेणीतील अत्युच्च शिखरे आढळतात. नारोद्नाय १,८९४ मी. उंचीचे आहे. येथून ही पर्वतश्रेणी दोन समांतर रांगांची बनते. उत्तरेकडे ती अरुंद होते व तेथेच आर्क्टिक उरलची २५ ते ३० किमी. लांबीची एकच पर्वतरांग आढळते. येथे तिची सर्वसामान्य उंची ६०० मी. असून ती तुटक व विरळ आहे. येथे या पर्वतरांगेचे नाव पैरवोय असे आहे. येथे हा पर्वत ओलांडण्यासाठी सोप्या वाटा पुष्कळ आहेत. झीजकार्याचे व स्थलीप्रायभूमीचे अनेक नमुने येथे दिसून येतात. मौंट साब्ल्या व मौंट नारोद्नाय यांवर हिमनद्या व हिमगव्हरे आढळतात. हे पर्वत ओसाड असून दक्षिणेकडील खालच्या उतारावर मात्र विरळ सूचिपर्णी जंगले आढळतात.

दक्षिण उरल: ही पर्वतश्रेणी मौंट युर्मापासून उरल नदीपर्यंत पसरली आहे. हिच्या रांगा कमी उंचीच्या असून मुगजार टेकड्यात मिसळून गेल्या आहेत. येथे या टेकड्या १६० किमी. रुंद असून त्यांच्या अनेक समांतर रांगा आहेत. यामनतौ हे शिखर १,६५६ मी. उंचीचे आहे. मौंट मॅग्नीनायासारख्या अवशिष्ट टेकड्या दक्षिणेकडील व पूर्वेकडील मैदानी प्रदेशात आढळतात. कमी उंचीच्या टेकड्यांचा हा प्रदेश पुढे स्टेप प्रदेशामध्ये गणला जातो.

मध्य उरल: तुलनेने अधिक रुंदीच्या व कमी उंचीच्या या भागात कुंझाकोपस्कीय कामेन हे सर्वोच्च शिखर सु. १,३७२ मी. उंच आहे. पुरातन झीजकार्याचे अवशेष २०० ते ६०० मी. उंचीवर आढळतात. जंगलयुक्त टेकड्यांमध्ये ग्रॅनाइटाचे मोठे विभाग आढळतात.

ट्रान्स-सायबीरियन रेल्वे ही सु. ४१० मी. कमी उंचीच्या मध्यउरल पर्वतश्रेणीतून जाते. दक्षिण उरलमधून क्वीबिशेव्ह-ताश्कंद रेल्वे जाते. एकूण उरल पर्वतश्रेणीतून उसा, पेचोरा, विशेरा, ब्येलाया, आणि उरल या नद्या पश्चिम उतारावरून वाहताना आढळतात. तसेच पूर्व उतारावरून सोस्या, तुरा, इसेट, मीआस आण तोबोल या नद्या वाहतात. उरल पर्वतश्रेणीमुळे पश्चिमेकडील वारे अडविले जातात. पूर्वेकडे खंडांतर्गत सायबीरियन हवामान विशेषत्वाने आढळते. अगदी उत्तरेकडे टंड्रा प्रकारची वनस्पती आहे. बाकी सर्वत्र सूचिपर्णी वृक्षांचे दाट अरण्य आहे. दक्षिण उरलमध्ये काही भागात पानझडी वृक्ष आढळतात. लाकूडतोड हा उरल पर्वतविभागातील एक मोठा व्यवसाय आहे. तथापि उरलचे खरे महत्त्व तेथील अपार खनिज संपत्तीसाठी आहे. सध्या रशियात खनिजद्रव्यासाठी सर्वांत जास्त लक्ष या प्रदेशावर दिले जात असून प्लॅटिनम, सोने, चांदी, तांबे, निकेल, मँगॅनीज, क्रोमियम, लोखंड, बॉक्साइट, मौल्यवान खडे, ॲस्बेस्टस, पोटॅश, मॅग्नेशियम, कोळसा, पेट्रोलियम, शिसे, जस्त वगैरे अनेक खनिजे तेथे आढळतात. यामुळेच त्याला खनिजांचा अजबखाना असे नाव मिळाले आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा परिणाम होऊन हा प्रदेश आता औद्योगिक दृष्ट्या खूपच महत्त्वाचा झाला आहे. येथील औद्योगिक उत्पादन डोनेट्स खोऱ्याच्या खालोखाल आहे. स्व्हर्डलोफ्स्क, चिल्याबिन्स्क, निझ्नितागिल, पर्म, उफा, मॅग्निटोगॉर्स्क, मॉलोटोव्ह, ईझेफ्स्क इ. मोठमोठी औद्योगिक केंद्रे या भागात आहेत. येथील कोळसा कोकिंग प्रकारचा नाही, म्हणून कुझ्नेट्स्क व कारागांदा भागांतून कोकिंग कोळसा आणून लोखंड व पोलाद कारखान्यांस पुरविला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर रासायनिक उद्योगधंद्यांची येथे विलक्षण वाढ झालेली आहे. हा अत्यंत विरळ लोकवस्तीचा प्रदेश असून दर चौ. किमी. ला १७ असे लोकवस्तीचे प्रमाण आहे. तुलनेने जरी उत्तरेकडील खाणींच्या वसाहती जुन्या असल्या, तरी दक्षिणेकडील शेतीप्रधान भागात सध्या जास्त लोकवस्ती आढळते. ७५% रशियन आणि युक्रेनियन लोकांची वस्ती असून उरलेल्या २५% मध्ये बश्किर, तातार, उद्‌मुर्त, कोमिक, पेरमियाक यांसारख्या जमातींचा समावेश होतो.

संदर्भ: Shabad, Theodore, Geography of the U. S. S. R., New York, 1958.

खातु, कृ. का.