फार्नबरो: ग्रेट ब्रिटनमधील हँपशर परगण्यातील एक शहर. लोकसंख्या ४१,२३३ (१९७१). येथे शाही विमान आस्थापना विभाग असून विमाननिर्मितिविषयक एक संशोधनकेंद्र आहे. ‘सोसायटी ऑफ ब्रिटीश एअरोस्पेस कंपनीज’तर्फे येथे होणारी द्विवर्षीय नागरी व सैनिकी विमानांची प्रात्यक्षिके वैशिष्ट्यपूर्ण असतात.

फ्रँको-प्रशियन युद्धांत (१८७०-७१) तिसऱ्या नेपोलियनचा पराभव करून प्रशियनांनी त्याला १९ मार्च १८७१ पर्यत बंदिवासांत ठेवले. त्यानंतर केंटमधील चिझलहर्स्ट या गावी तो आपली पत्नी यूझेनीसह राहू लागला व तेथेच तो ९ जानेवारी १८७३ मध्ये मरण पावला. त्याच्या मृत्युनंतर महाराणी युझेनी फार्नबरोस आली व ‘फार्नबरो हिल’ नावाच्या एका निवासात राहू लागली (१८८१-१९२०). १८८७ मध्ये तिने येथे सेंट मायकेलचे रोमन कॅथलिक चर्च बांधले व तेथेच आपल्या पतीचे स्मारक उभारले. झूलू युद्धात (१८७९) राजपुत्र ल्वी मरण पावल्यानंतर त्याचे व यूझेनीच्या मृत्युनंतर (११ जुलै १९२०) तिचे, अशी दोघांचीही स्मारके या चर्चमध्ये उभारली आहेत.

गद्रे, वि. रा.