पठार: उंचावरील मैदाने असे पठारांचे वर्णन करता येईल. ही उंचावरील मैदाने एका किंवा अनेक बाजूंनी तीव्र उतारांची असतात. पठारी प्रदेशांत मैदानांसारखे सपाट भाग व उंचसखल भागही थोडेसे असतात. त्यांमुळे पठार हे एक वैशिष्ट्यपूर्ण भूमिस्वरूप म्हणून ओळखले जाते. पठारी प्रदेशांची उंची सामान्यतः ३०० ते ९०० मी. पर्यंत आढळते, परंतु तिबेटचे पठार व बोलिव्हियाचे पठार ही दोन्ही पठारे ३,००० मी. पेक्षा जास्त उंचीवर आहेत. जगातील जमिनीचे पुष्कळ भाग पठारांनी व्यापलेले आढळतात. जगातील प्रत्येक खंडात पठारे असून, आफ्रिका खंड म्हणजे एक महाप्रचंड पठारच आहे. पठारांची निर्मिती अनेक कारणांमुळे होऊ शकते परंतु भूमिखंडे निर्माण करणाऱ्या हालचाली आणि लाव्हाचे भेगी उद्‌गीरण या दोन प्रमुख कारणांमुळे जगातील पठारे निर्माण झालेली आढळतात. हिमयुगात हिमाच्छादनामुळे संरक्षिले जाऊनही काही प्रदेश पठारस्वरूप बनलेले आहेत. पठारांची निर्मिती व त्यांचे स्थान यांवरून त्यांचे वर्गीकरण केले जाते.

भूपृष्ठावरील आजचे खंडप्रदेश पुराजीव महाकल्पात एकाच महाखंडाचे किंवा सलग भूमीचे भाग होते. उत्तर कार्‌बॉनिफेरस कालखंडात हालचालींमुळे ती फुटून तिचे प्रथम लॉरेंशिया व गोंडवनभूमी असे दोन प्रमुख भाग झाले. नंतर हे दोन खंडप्रदेश विभागून इतर खंडे तयार झाली. प्रत्येक खंडात वरील महाखंडांचे अवशेष आढळतात. हे अवशेष म्हणजे अतिप्राचीन काळात तयार झालेली पठारे आहेत. गोंडवनभूमीचे विखंडन होऊन दक्षिण अमेरिकेतील गियाना (ब्राझील) पठार, आफ्रिकेतील पठार, अरेबियाचे पठार, भारतातील दख्खनचे पठार व पश्चिम ऑस्ट्रेलियातील पठार ही पठारे तयार झाली तर लॉरेंशियाच्या विभंजनामुळे सायबीरियातील अंगारा पठार, स्कँडिनेव्हियाचे पठार व कॅनडाचे पठार ही पठारे निर्माण झाली असावीत.  ग्रीनलंडच्या व स्कँडिनेव्हियाच्या पठारांवर हिमनद्यांमुळे सरोवरे तयार झाली. ज्वालामुखी क्रियेमुळेही पठारे तयार होतात. भेगी उद्‌गीरण क्रियेमुळे वरील प्रकारच्या पठारांची निर्मिती होते. भूपृष्ठाला प्रचंड भेग पडून शिलारस बाहेर येतो. त्याचे थरावर थर साचत जातात व त्यांपासून उंच-सखल पठारे तयार होतात. संयुक्त संस्थानांतील कोलंबियाचे पठार, भारतातील दख्खनच्या पठाराचा वायव्य भाग, आयर्लंडमधील अँट्रिमचे पठार ही पठारे वरील प्रकारे तयार झाली असावीत, असा अंदाज आहे. वरील प्रकारची पठारे शिलारसापासून बनलेली असतात. संयुक्त संस्थानांतील कोलंबियाच्या पठाराची रुंदी १६० किमी. असून एकूण विस्तार सु. एक लक्ष चौ. किमी. व पठारावरील शिलारसाची जाडी १,५०० मी. इतकी असावी. पठाराखाली शिलारसाचे सु. २० थर असून प्रत्येक थराची जाडी वेगवेगळी आहे. कोलंबियाचे पठार मायोसीन काळात तयार झाले असावे. भारतातील दख्खनच्या पठाराचा वायव्य भाग वरील प्रकारेच तयार झाला असावा. मध्यजीव महाकल्पाच्या शेवटी भेगी उद्‌गीरण अनेक वेळा होऊन हे पठार तयार झाले असावे. लाव्हारसाच्या उद्रेकामुळे तयार झालेली पठारे संयुक्त संस्थानांच्या ऑरेगन, नेव्हाडा, आयडाहो व वायोमिग या राज्यांत आढळून येतात. आफ्रिकेतील ड्रेकन्सबर्गचे पठार, ब्राझील, यूरग्वाय व अर्जेंटिना येथील पाराना पठार व न्यूझीलंडच्या उत्तर बेटातील इग्निम्ब्राईट पठार ही लाव्हारसापासून तयार झालेली पठारे आहेत. इग्निम्ब्राईट व येलोस्टोन या पठारांवर रायोलाइट प्रस्तर आहेत.

पर्वतांतर्गत पठार: हा पठाराचा आणखी एक प्रकार असून भूमिखंडे निर्माण करणाऱ्या अंतस्थ हालचालींपासून वरील प्रकारची पठारे निर्माण होतात. उंच पर्वतराजींनी वेढलेली असल्यामुळे या पठारांची सरासरी उंची बरीच म्हणजे १,००० मी. पेक्षा जास्त आढळून येते. चीनमधील तिबेटचे पठार हे पूर्वेकडे थोडे कललेले असून याच्या उत्तरेस कुनलुन पर्वत व दक्षिणेस हिमालय पर्वत आहे. पठाराची सरासरी उंची ४,००० मी. असून काही भाग ३,६०० मी., तर काही ५,००० मी. उंचीवर आहेत. एकूण १४,००,००० चौ. किमी. क्षेत्रफळ आहे. प्रदेशाच्या उत्तर व ईशान्य भागांत खाऱ्या पाण्याची अनेक सरोवरे आहेत, तेथे अंतर्गत जलोत्सारण आढळते. तिबेटच्या पठाराच्या दक्षिण भागात सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्या उगम पावतात, तर आग्नेय भागात ह्‌वांग हो, यांगत्सी, मेकाँग व सॅल्वीन या नद्यांची उगमस्थाने आहेत. या पठाराचा काही भाग हिमरेषेपेक्षा उंच असल्याने तेथील बर्फ उन्हाळ्यात वितळते व त्यामुळे वरील नद्यांना पाणीपुरवठा होतो. बोलिव्हियाचे पठार व अमेरिकेतील सॉल्ट लेक पठार ही पठारे वरील गटात मोडतात.

महाद्वीपीय पठारे: ही पठारे अतिशय विस्तृत असून त्यांनी खंडांचा खूपच मोठा भाग व्यापलेला आढळून येतो. यांना शील्ड किंवा ढालक्षेत्र असेही म्हणतात. या पठारांचा बराचसा भाग झिजेमुळे किंवा अनावरणामुळे उघडा पडतो आणि नंतर ऊर्ध्वगामी हालचालींमुळे उचलला जातो. थायलंडमधील कोराटचे पठार, ब्रह्मदेशातील शानचे पठार, आफ्रिकेतील व अरबस्तानातील पठारे व भारतातील दख्खनचे पठार ही पठारे महाद्वीपीय पठारे म्हणून ओळखली जातात. समुद्रसपाटीपासून वरील पठारे सरासरीने ७०० मी. उंचीवर असून त्यांची समुद्राकडील बाजू तीव्र उताराची असते.

पर्वतपदीय पठारे: ही उत्तुंग पर्वतश्रेण्यांच्या पायथ्यांशी आढळून येतात. पर्वतांची निर्मिती होत असताना प्रथम उंचसखल मैदाने तयार होतात व त्यांपैकी काही भाग इतर भागांच्या अनुरोधाने उचलले जाऊन पर्वतपदीय पठारे तयार होतात. संयुक्त संस्थानांत ॲपालॅचिअन पर्वताच्या पूर्वेकडील पायथ्याशी पीडमाँट नावाचे पठार आहे. या पठाराच्या पूर्वेस अटलांटिक महासागराच्या संचयन क्रियेने तयार झालेले किनाऱ्यावरील मैदान आहे. उत्तर अमेरिकेतील कोलोरॅडोचे पठार युनिटा, रॉकी व सॅन वॉन पर्वतांनी वेढलेले आहे. दक्षिण अमेरिकेतील पॅटागोनियाचे पठार रॉकी पर्वताच्या पायथ्याशी आहे. इटलीचे पठार वरील प्रकारातच मोडत असून ते आल्प्स पर्वताच्या दक्षिण पायथ्याशी आहे.

हिनमदीच्या घर्षण कार्यामुळेही पठारे तयार होतात. प्लाइस्टोसीन कालखंडात अमेरिका, यूरोप व यूरेशिया या खंडांचे उत्तर भाग हिमावरणाखाली होते परंतु तपमानात वाढ झाल्यानंतर बर्फाचा विस्तार कमी होत गेला व बर्फाच्या घर्षण कार्यामुळे वरील विभागांतील उंच पर्वतमय प्रदेशांचे क्षरण होऊन तेथे पठारांसारखे प्रदेश तयार झाले असावेत. ग्रीनलंड व अंटार्क्टिका येथील पठारे वरील प्रकारे तयार झाली आहेत. अत्यंत थंडीमुळे म्हणजे तापमान शून्याखाली अनेक अंश असल्याने वरील प्रदेशांत नद्या आढळत नाहीत, त्यामुळे ओलसर प्रदेशातील पठारांवर नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारी भूमिस्वरूपे ग्रीनलंड व अंटार्क्टिका येथे नाहीत. फक्त ग्रीनलंडमध्ये पठारांवर एकमेकांना समांतर असे कटक आहेत. त्यांची उंची आजूबाजूंच्या भागांपेक्षा सु. १० मी. पर्यंत जास्त असते, त्यांना ‘झासट्रगी’ असे म्हणतात. वारा व प्रवाही बर्फ यांमुळे झासट्रगी तयार होतात. काही ठिकाणी बर्फाच्या थराची जाडी १,५०० मी. इतकी आहे. ग्रीनलंड व अंटार्क्टिका यांमधील पठारे हजारो मीटर बर्फाखाली असल्याने खूपच सपाट आहेत. या पठारांवर असलेली आणि बर्फावर डोकावणारी शिखरे ‘हिमस्थगिरी’ या नावाने ओळखली जातात.


हिमनदीच्या संचयन कार्यामुळेदेखील पठारे तयार होतात. कमी उंची असलेल्या प्रदेशांत हिमनदीच्या संचयन कार्यामुळे दगडयुक्त माती पसरवली जाते व तेथे उंच-सखल असे प्रदेश तयार होतात. मैदानी प्रदेशांपेक्षा त्यांचे स्वरूप वेगळे असते. जर्मनीमधील प्रशियाचे पठार वरील प्रकारात मोडते. लडाखमधील देवसई भागही हिमनदीच्या संचयनामुळे तयार झालेला आहे. सायबीरियातील अंगारा पठाराच्या काही भागावर हिमनदीच्या संचयनक्रियेचा परिणाम झालेला आहे.

वाऱ्याच्या संचयनकार्यामुळेही पठारे तयार होतात. चीनमधील लोएसचे पठार मध्य आशियातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तयार झालेले आढळते. चीनमधील शान्सी व शेन्सी प्रांतांचा बराचसा भाग लोएसव्याप्त असून काही ठिकाणी लोएसची जाडी २०० मी. पर्यंत आहे. पाकिस्तानातील पोटवारचे पठारही वाऱ्याच्या संचयनकार्यामुळे तयार झालेले आहे पण लोएसचे पठार कोरड्या हवामान विभागात असल्याने व लोएस अत्यंत भुसभुशीत असल्यामुळे पठारावर हंगामी प्रवाहांमुळे खोल दऱ्या तयार झालेल्या आहेत. ही पठारे शेतीसाठी उपयुक्त ठरली आहेत. अमेरिकेतील कोलोरॅडो पठारामध्ये कोलोरॅडो नदीने ग्रँड कॅन्यन नावाची घळई खोदलेली आहे. अत्यंत कोरडे हवामान, पठारावरील मऊ प्रस्तर, नदीच्या खोदकामाची तीव्रता व त्याचवेळी होणारी ऊर्ध्वगामी हालचाल यांमुळेच नदीने प्रचंड शिल्पकाम घडवून आणले आहे. कोरड्या हवेतील पठारी प्रदेशांत अनेक तुटलेले कडे असतात. अमेरिकेतील कोलोरॅडोच्या पठारावर व बेसीन आणि रेंज विभागांत अनेक ठिकाणी अकस्मात निर्माण होणाऱ्या प्रवाहांमुळे पठारे अनेक ठिकाणी विच्छिन्न झाली असून, मोठ्या पठारांचे छोटेछोटे तुकडे झालेले आहेत त्यांना ‘मेसा’ असे म्हणतात. हे मेसा एकमेकांपासून कोरड्या, परंतु अत्यंत लहान खोऱ्यांनी अलग झालेले आहेत. या खोऱ्यांना ‘अरॉइयो’ असे म्हणतात. या मेसांचे छोटे भाग स्कंधगिरी (ब्यूट) या नावाने ओळखले जातात. कोरड्या पठारी प्रदेशांत घळी धूप अत्यंत जोरदार असते, त्यामुळे मेसा व स्कंधगिरी तयार होतात. त्यांचे रूपांतर नंतर दुर्भूमी (उत्खातभूमी) मध्ये होते.

प्राचीनकाळी निर्माण झालेल्या घडीच्या पर्वतांची झीज होऊन अवशिष्ट स्वरूपात राहिलेलीदेखील काही पठारे आहेत. आर्देन, स्कँडिनेव्हियाचे पठार, ॲपालॅचिअनमधील ॲलेगेनी व कंबर्लंड पठार, स्कॉटलंडमधील हायलँड्स ही अवशिष्ट पठारांची महत्त्वाची उदाहरणे आहेत.

पठारी प्रदेश पर्वतवेष्टित असल्यास अनेक ठिकाणी बोलसन भूमीची निर्मिती होते. पठारांचे काही भाग झिजेच्या घटकांमुळे विच्छिन्न होतात आणि तेथे खाचखळगे तयार होतात. या खोलगट प्रदेशांच्या मध्यभागी त्या विभागातील सर्व प्रवाह एकत्र येतात.

ओलसर प्रदेशात पठार असल्यास त्याच्या वेगवेगळ्या भागांचे निरनिराळ्या प्रकारे अनावरण होते. अशा पठारांचे अनेक भाग कमीअधिक गतीने झिजले जातात. आफ्रिकेच्या पठारावर काँगो व तिच्या उपनद्यांनी अनेक ठिकाणी धावत्या व धबधबे तयार केलेले आहेत. अँडीज पर्वताच्या पूर्व व पश्चिम रांगांमधील बोलिव्हियाचे पठार ‘आल्टीप्लानो’ या नावाने ओळखले जाते. या पठाराची उंची ३,००० ते ४,७०० मी. वर आहे परंतु अनेक घटकांच्या खननकार्यामुळे हे पठार अत्यंत खडबडीत झालेले आहे. या पठाराचा पृष्ठभाग अनेक ठिकाणी चंद्राच्या पृष्ठभागासारखा–विवरे असलेला–आहे.

पठारी प्रदेशांत सपाट भूमी बरीच असते, परंतु बहुतेक पठारी प्रदेश वर्षाछायेच्या भागात येत असल्याने तेथील हवामान कोरडे असते व पाऊस अनिश्चित स्वरूपाचा असतो. त्यांमुळे पठारावर सुपीक जमिनी असूनदेखील दुबार पिके काढणे कठीण जाते. असिताश्मापासून तयार झालेल्या पठारी प्रदेशांत रेगूर जातीच्या सुपीक जमिनी आढळतात. पाणीपुरवठा मुबलक असल्यास त्यातून भरघोस पिके मिळतात. आफ्रिकेचे, ऑस्ट्रेलियाचे व दख्खनचे पठार यांवर हिरे, सोने, कोळसा, तांबे इत्यादी खनिजे आढळतात. ब्राझिलच्या व दख्खनच्या पठारांवर लोह, मंगल इ. खनिजे आहेत. शेती आणि खाणकाम यांच्या विकासामुळे तेथे डोंगराळ भागांपेक्षा जास्त लोकवस्ती आढळते. पठारी प्रदेशांवर कुरणे मोठ्या संख्येने आहेत. तिबेट, अरबस्तान, पामीर, तुर्कस्तान येथील पठारांवर भटक्या जमाती आहेत. गुरे व मेंढपाळी हे महत्त्वाचे व्यवसाय बनलेले आहेत. तथापि दळणवळणाच्या अडचणींमुळे एकूण लोकजीवनाला बळकट आर्थिक बैठक मिळत नाही. मानवी जीवन मागासलेले व अस्थिर असते.

भागवत, अ. वि.