जांबी शहर : सुमात्राच्या आग्नेय भागातील शहर. लोकसंख्या ९,३९,००० (१९७१). जांबी प्रांताची ही राजधानी जांबी (हारी) नदीच्या तीरावर, बेरहाला सामुद्रधुनीच्या पश्चिमेस ९६किमी. व पालेंबांगच्या वायव्येस २०० किमी.वर आहे. ह्याच्या आसमंतात रबर, लाकूड, वेत, खनिज तेल व कोळसा ह्यांचे विपुल उत्पादन होते. रबर, नीळ व तेल निर्यात होते. हे तेलाचे महत्त्वाचे केंद्र असून येथे मोठा व्यापार चालतो. येथे १९६३ मध्ये विद्यापीठ स्थापन झालेले आहे. सातव्या शतकात मलयू या हिंदू राज्याची जांबी ही राजधानी झाली. १६०६ मध्ये तेथे डचांचे व्यापारी ठाणे झाले व १९१६ मध्ये ते डच अंमलाखाली गेले.

लिमये, दि. ह.