वायव्य सरहद्द प्रांत : पाकिस्तानातील उत्तरेकडील एक प्रांत. या प्रदेशातील पेशावरच्या पश्चिमेस इतिहासप्रसिद्ध खैबर खिंडीचा मार्ग असून हिंदुस्थानचे उपखंड आणि अफगाणिस्तान या दोहोंमधील ते मोक्याचे स्थान होते. त्यामुळे त्याच्यावर अधिसत्ता मिळविण्याचे प्राचीन काळी अनेक राज्यकर्त्यांनी प्रयत्‍न केले. स्थूलमानाने पश्चिम व उत्तरेस अफगाणिस्तान, ईशान्येस जम्मू-काश्मीरचा प्रदेश, आग्नेयीस पंजाब आणि नैर्ऋत्येस बलुचिस्तान यांनी तो सीमित झाला असून प्राचीन काळी तो गांधार देश या नावाने प्रसिद्ध होता. प्राकृतिक दृष्ट्या या प्रदेशाचे सिंधचा हजारा जिल्हा, सिंधू नदी आणि टेकड्या यांमधील पेशावर, कोहाट, बन्‍नू व डेरा इस्माइलखान जिल्ह्यांचा प्रदेश आणि उत्तर व पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश, असे तीन भाग पडतात. त्याची लांबी ६६५ किमी. असून रुंदी सु. ४५४ किमी. आहे. क्षेत्रफळ १,०६,२०० चौ. किमी. आहे. लोकसंख्या १,०९,३७,००० (अंदाज १९८३) होती. पेशावर हे राजधानीचे ठिकाण आहे. या सर्व प्रदेशाचे हवामान विषम व कोरडे असून डेरा इस्माइलखान जिल्ह्यात उन्हाळ्यात अधिक (सरासरी ४२ से. तापमान) उष्मा असतो. सापेक्षतः इतर भागांत समशीतोष्ण हवा असते. हिवाळ्यात थंडी (तापमान ५से.) अतिशय जाणवते. दोन मोसमी वाऱ्यांनी येथे पाऊस पडतो : एक, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी आणि दोन, इराक-इराणकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यांमुळे मात्र सरासरी वार्षिक पर्जन्यमान ३० ते ४० सेंमी. असते.

येथील भूपृष्ठभाग उंचसखल आणि उजाड डोंगरांनी व्यापलेला आहे. त्यातून काबूल व कुर्रम या प्रमुख नद्या वाहतात. काबूल नदी पश्चिमेकडून पूर्वेस वाहते. कुर्रम नदीने उत्तरेकडील हिंदुकुश प्रदेशाचे दोन स्वतंत्र नैसर्गिक पर्वतश्रेणीत भाग पडले असून त्यांना अनुक्रमे उत्तर हिंदुकुश व हिंदुराज म्हणतात. हिंदुकुशमधील तीरिच मीर हे सर्वांत उंच शिखर (७,६९० मी.) आहे. हिंदुकुशच्या दक्षिणेकडे पंजकोरा, स्वात या नद्यांची खोरी आहेत. तेथे कृषी हा प्रमुख व्यवसाय चालतो. गहू हे प्रमुख पीक असून मका, बाजरी, सातू, ऊस, तंबाखू, कापूस, व फळभाज्या ही अन्य पिके निघतात. डाळिंबे,द्राक्षे आणि सफरचंदे ही या भागातील प्रमुख फळे असून त्यांच्या विपुल बागा आहेत. काबूल नदीवरील वार्सक जलप्रकल्पामुळे जलसिंचनाची व्यवस्था झाली असून येथील कृषी व्यवसायास चालना मिळाली आहे. लोखंड, तांबे, संगमरवरी दगड, सैंधव, जिप्सम, अँटिमनी आणि कोळसा ही या प्रदेशात सापडणारी काही प्रमुख खनिजे होत. जंगलांचे प्रमाण कमी असून डोंगरमाथ्यांवर मेंढपाळीचा धंदा चालतो. या प्रांताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषिप्रधान असून लघुउद्योगांबरोबर कापडउद्योग आणि लोकरीचे कपडे बनविण्याचा व्यवसायही काही प्रमाणात आढळतो. याशिवाय सिमेंट, कागद, सिगारेटी, रसायने, साखर, खते यांचे कारखाने असून हस्तव्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतात. या प्रदेशात प्रामुख्याने पठाण लोकांची वस्ती असून ते पुश्तू भाषा बोलतात. हजारा आणि डेरा इस्माइलखान जिल्ह्यांत पंजाबी भाषा अधिकतर बोलली जाते. पठाणांच्या अनेक कुळी (खेल) असून प्रत्येक प्रमुख आपल्या वंशा-वळीचा अभिमान दर्शवितो. युसुफझई, उत्तमान खेल, मोहंमद, अफ्रिडी, ओरकझई, शिन्वारा, वझीरी या आणखी काही प्रमुख मुस्लिम जमाती होत. सय्यद, तनवली, धुंड, कुरेशी, जाट, बलुची, शेख, खरळ, वाघबान, पराछ, कस्साब या काही मुसलमान जाती असून अरोर, खत्री, ब्राह्मण अशा काही तुरळक हिंदू जातीही या प्रदेशात आढळतात. हजारा जिल्ह्यात गुजर नावाचे लोक दिसतात. पेशावरच्या वायव्येस काबूल व स्वात नद्यांच्या दुआबात मोहंमद, खैबरच्या दक्षिणेस अफ्रिडी व कुर्रम नदीच्या परिसरात वझीरी टोळ्या राहतात. या सर्व भूभागाला सामान्यतः टोळ्यांचा मुलूख म्हणतात. युसुफझई ही येथील जुनी मूळ भाषा असून या भाषेत जुने पौराणिक ग्रंथ लिहिलेले आहेत. येथील सरहद्दीवर राहात असलेले लोक हिंदकी व जतकी बोलीभाषा वापरतात. ओरमूर लोक एक निराळीच इराणी बोलीभाषा बोलतात. रेल्वेमार्ग होईपर्यंत या प्रदेशात वाहतुकीसाठी घोड्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असे.

इतिहास: या प्रांताचा अतिप्राचीन इतिहास ज्ञात नाही या प्रदेशातून भारतीयांची पूर्व इराणशी जा-ये असावी, असा तज्ञांचा अंदाज आहे. कोरीव लेखांवरून असे दिसते की, इ. स. पू. ५१८ मध्ये पहिला डरायस हिस्टॅस्पिस (इ. स. पू. ५५८-४८६) याने ह्या प्रदेशावर आपले आधिपत्य स्थापन केले. प्राचीन इराणमधील ॲकिमेनिडी वंशातील पहिला डरायस, झर्कसीझ आणि तिसरा डरायस (इ. स. पू. ३३६ – ३३०) यांनी या प्रांतावर राज्य केले. त्यानंतर इ. स. पू. ३२७ च्या मेमध्ये अलेक्झांडर द ग्रेटने हिंदुकुश ओलांडून भारतावर स्वारी केली. अलेक्झांडरची एक तुकडी हेफॅस्टिअन आणि पर्डिकॅस यांच्या नेतृत्वाखाली खैबर खिंड ओलांडून सिंधूच्या खोऱ्यात उतरली. अलेक्झांडरने पोरसचा पराभव केला. परंतु त्याचे राज्य त्यास परत केले. पोरसचा पुढे खून झाला असावा. त्यानंतर नंद वंशाच्या आधिपत्याखाली हा भाग होता पण नंदांच्या पराभवानंतर हा प्रदेश मौर्यवंशाच्या आधिपत्याखाली आला (इ. स. पू. ३२१ – १८७). अशोकानंतर वायव्य प्रदेशावर परकी आक्रमणे होऊ लागली. अशोकाने या प्रदेशात बौद्ध धर्माचा प्रसार केला. हजारा जिल्ह्यास पूर्वी  पाखली म्हणत असत. बॅक्ट्रियाच्या डीमीट्रिअस (इ. स. पू.  १९० – १६७) या राजाने यावर सत्ता गाजविली. पुढे युक्रेटिडीसने  (इ. स. पू. १७० – १५९) बॅक्ट्रिया घेऊन डीमीट्रिअसचा पराभव केला परंतु पुढे त्याचाही खून झाला (इ. स. पू. १५९). मध्यंतरी यवन (ग्रीक) राजा मीनांदर (इ. स. पू. १११ – ९०) याने वायव्य प्रांतासह पंजाब-सिंधचा काही भाग आपल्या अंमलाखाली आणला. त्यानंतर शकांच्या सिंधुप्रदेश व पंजाब यांवर स्वाऱ्या झाल्या. शकनृपती मौएस (कार. इ. स. पू. २० – इ. स. २२) याने बोलन खिंडीतून येऊन सिंधुप्रदेश-अफगाणिस्तान हे भूभाग व्यापले आणि आपले राज्य तक्षशिला येथे स्थापले. त्यानंतर कुशाण वंशातील राजांनी काबूलच्या दक्षिणेकडील दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश पादाक्रांत केला. कुशाण राजा दुसरा वीम कडफिससने वायव्य हिंदुस्थान जिंकला. त्याच्यानंतर कनिष्क, वासिष्क, हुविष्क व वासुदेव या राजांनी तेथे राज्य केले. कनिष्काने (सु. इ. स. पहिले शतक) वायव्य प्रांतावर लल, वेश्पशी, लिअक यांसारखे क्षत्रप नेमले असल्याचे कोरीव लेखांत उल्लेख मिळतात. कुशाणांच्या ऱ्हासानंतर हूण या रानटी टोळ्यांनी बॅक्ट्रियात सत्ता संपादून हिंदुस्थानकडे आपला मोर्चा वळविला. इ. स. ५६५ मध्ये तुर्कांनी हूण टोळ्यांचा बंदोबस्त केला.


त्यानंतर अरबांनी बोलन खिंडीतून ६५९ व ६६४ मध्ये हिंदुस्थानात प्रवेश मिळविण्याचा प्रयत्‍न केला तथापि मुहंमद कासिमची ७११ ची सिंधवरील स्वारी, हेच मुसलमानांचे या प्रदेशावरील मोठे लष्करी आक्रमण होय. गांधार व काबूल खोरे नवव्या शतकापर्यंत तुर्की शाही वंशाच्या अमलाखाली होते. शाही राजा लगतुर्मान यास त्याचा हिंदू मंत्री कल्लर याने पदच्युत करून स्वतःस राज्याभिषेक केला व हिंदू शाही घराणे स्थापन केले. तिचा राजतरंगिणीत लल्लिया शाही वा लल्लिया असा उल्लेख आढळतो. या हिंदू राजावर याकूब इब्‍न लेयात याने इ. स. ८७० मध्ये स्वारी केली. तेव्हा लल्लियाने सिंधूच्या उजव्या तीरावर उदभांड (आधुनिक उंद) येथे राजधानी हलविली. त्यानंतर काश्मीरच्या उत्पल वंशातील शंकरवर्मन (कार. ८८३ – ९०२) राजाने यावर स्वारी केली, लल्लियाने ती परतून लावली. लल्लियाला तोरमाण नावाचा मुलगा होता. लल्लियाच्या मृत्यूनंतर शाही घराण्यातील एका सामंत नावाच्या बंडखोराने ही गादी बळकाविली. तेव्हा उत्पल वंशातील गोपालवर्मन (शंकरवर्मनचा पुत्र) याचा मंत्री प्रभाकर याने उदभांड लुटले. बंडखोर सामंतास शासन करून मूळ वंशज तोरमाण यास गादीवर बसविले. त्याने त्याचे नाव कमलूक ठेवले. अल् बीरूनी त्याचा कमलू असा उल्लेख करतो. महंमूद गझनी याने वडिलांचेच धोरण अवलंबून हिंदुस्थानवर सतरा स्वाऱ्या केल्या (१००१ – २४). इ. स. १००१ मध्ये त्याने लाहोरच्या जयपालविरुद्ध विजय मिळविला, १००४ – ०५ मध्ये मुलतान व पंजाब यांवर चढाई केली आणि नंतर जयपालाचा मुलगा अनंगपाल याचाही पराभव केला. यानंतर घोरी घराण्यातील घियासुद्दीनने ११७३ मध्ये गझनी शहर घेऊन तेथे मुहम्मद घोरी या भावास गादीवर बसविले. मुहम्मद घोरी (कार. ११७५ – १२०६) याने हिंदुस्थानात मुसलमानी राज्याचा पाया घातला. यानंतर वायव्य सरहद्द प्रांतावर मंगोलांच्या स्वाऱ्या झाल्या. नासिरउद्दीन महंमूद हा अखेर मंगोलांचा मांडलिक बनून येथे राज्य करू लागला (१२४९). यानंतर समरकंदचा राजा तैमूरलंगाने १३९८ मध्ये हिंदुस्थानवर स्वारी केली. त्यानंतर बहलोल लोदी १४५१ मध्ये दिल्लीच्या तख्तावर बसला. लोदी घराण्याच्या कारकीर्दीत (१४५१ – १५२६) बाबराचा चुलता मिर्झा उलुघबेग याने अफगाणांना पेशावर-स्वातकडे हाकून लावले. पुढे बाबराने (कार. १५२६ – ३०) हिंदुस्थानवर स्वारी केली (१५२६). त्यानंतर हिंदुस्थान मोगलांच्या अंमलाखाली आला. हुमायूनने कामरानचा पाडाव करून १५४८ मध्ये पेशावर घेतले. अकबराच्या कारकीर्दीत त्याचा सेनापती कुंवर मानसिंग ह्याने काबूल व पेशावर घेतले आणि मानसिंग हाच ह्या प्रांताचा सुभेदार बनला. येथील लोकांनी १५५८ मध्ये जलाल या स्थानिक सरदाराच्या नेतृत्वाखाली बंड केले. त्यांनी मानसिंगला खैबर घाटातून परतविले. अकबराने युसुफशाहचा बीमोड करण्यासाठी १५८७ मध्ये झैनखान कोका यास पाठविले परंतु त्यात मोगल सैन्याचा पराभव होऊन वीरबल धारातीर्थी पडला. पुढे झैनखानाने पेशावरचा किल्ला घेऊन तिराहखान व बाजौर हे प्रांत काबीज केले (१५९२). जहांगीरच्या मृत्यूनंतर अफगाण लोकांनी बंड केले (१६२७) आणि रोशानी लोकांनी १६३० मध्ये पेशावरला वेढा घातला पण तो फार काळ टिकला नाही आणि मोगलांचा पुन्हा या प्रांतात जम बसला तथापि युसुफझई, अफगाण आणि अफ्रिडी या तेथील पठाण जमाती मोगलांविरुद्ध अधूनमधून बंडाळी करीत. अफ्रिडींविरुद्ध १६७३ – ७४ मध्ये खुद्द औरंगजेबाने हसन अबदाल येथे येऊन समझोता केला आणि तेथील पुढाऱ्यांना जहागिरी दिल्या. पुढे नादिरशाह अहमदशाह दुर्रानी याने हा प्रांत पादाक्रांत केला (१७३८). दुर्रानीने पेशावर येथे स्वतंत्र गादी स्थापन केली. पुढे काही वर्षे या प्रदेशावर अफगाणांच्या दुर्रानी वंशाची सत्ता राहिली परंतु कमकुवत राज्यकर्त्यांमुळे छोटे सरदार स्वतंत्र झाले. परिणामतः पेशावर बारकझई वंशाच्या वर्चस्वाखाली गेले  आणि डेरा इस्माइलखान सदोझई लोकांच्या हाती गेले. मध्यंतरी मराठ्यांनी अटकपर्यंत स्वारी करून काही दिवस हा प्रदेश आपल्या ताब्यात ठेवला. एकोणिसाव्या शतकात शिखांनी यावर अंमल बसविला (१८१८). रणजितसिंगाकडून ब्रिटिशांनी तो हस्तगत करीपर्यंत तो त्यांच्या आधिपत्याखाली होता. पहिल्या इंग्रज-शीख युद्धानंतर (१८४५) हर्बर्ट एडवर्डस् याने बन्‍नू लोकांस लाहोर दरबारच्या अंमलाखाली आणले. १८३४ मध्ये शीख सेनापती हरिसिंग याने अफगाणांचा नौशहर येथे पराभव करून पेशावरचा किल्ला घेतला. दुसऱ्या इंग्रज-शीख युद्धानंतर ब्रिटिशांनी तो आपल्या राज्यास जोडला. ब्रिटिशांबरोबरच्या १८४९ च्या जाहीरनाम्याने सरहद्दीवरील सर्व प्रदेश ब्रिटिशांच्या अखत्यारीत आला. पेशावर, कोहाट आणि हजारा ह्या तीन जिल्ह्यांचा एक विभाग करून त्यावर एक आयुक्त नेमण्यात आला  (१८५०) आणि डेरा इस्माइलखान व बन्‍नू यांवर उपायुक्त नेमण्यात आला. हा सर्व टापू आपल्या संपूर्ण वर्चस्वाखाली आणून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटिशांनी १८५८ – १९०२ दरम्यान अनेक मोहिमा काढल्या, पण हे त्यांचे प्रयत्‍न निष्फळ ठरले. या काळात डेरा इस्माइलखान व बन्‍नू हे दोन जिल्हे डेरा जाट विभागात समाविष्ट करण्यात आले. त्यानंतरच्या गंडमक तहानुसार खैबर व महंमद खिंडीचा ताबा ब्रिटिशांकडे आला (१८७९) तथापि ब्रिटिशांना येथील स्थानिक बंडांना वारंवार तोंड द्यावे लागत होते. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांचे खून झाले. ब्रिटिशांनी भारतातील विद्यमान पंजाब धरून या सर्व प्रदेशाचा एक स्वतंत्र प्रांत बनविला आणि त्याचे नाव नॉर्थ वेस्ट फ्राँटिअर प्रॉव्हिन्स असे ठेवले. त्याची प्रशासनव्यवस्था पेशावर येथून मुख्य आयुक्तामार्फत करण्यात येऊ लागली आणि १९०१ मध्ये हा प्रांत वेगळा करण्यात आला. पुढे १९३५ च्या भारतीय कायद्याने हिंदुस्थानातील अनेक प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली आणि त्यानुसार या प्रांतासही स्वायत्तता देण्यात आली. या प्रांताचा दर्जा १९३५ च्या भारत कायद्यानुसार राज्यपालांचा प्रदेश म्हणून जाहीर करण्यात येऊन त्यावर राज्यपाल नेमण्यात आला. भारत-पाकिस्तानचे १९४७ मध्ये विभाजन झाल्यानंतर तेथे सार्वमत घेण्यात आले. त्यानुसार येथील बहुसंख्यांक लोकांनी पाकिस्तानात सामील होण्यास संमती दर्शविली. १९५० मध्ये फुलरा व अंब संस्थाने वायव्य सरहद्द प्रांतात विलीन करण्यात आली. त्यानंतर १९५५ मध्ये हा भूप्रदेश इतर प्रांतांबरोबर पश्चिम पाकिस्तानात अंतर्भूत करण्यात आला. पुढे १९७१ मध्ये बांगला देशाच्या स्थापनेनंतर जो उर्वरित पाकिस्तान देश राहिला, त्यावेळी यास पुन्हा स्वतंत्र प्रांताचा दर्जा देण्यात आला. त्यात स्वात, चित्रळ आणि दीर ह्या भूतपूर्व संस्थानांतील प्रदेश अंतर्भूत करण्यात आला. १९७० ते १९८५ दरम्यान अफगाणिस्तानातील अनेक लोकांनी रशियाव्याप्त अफगाणिस्तानातून सुटका करून घेण्यासाठी या प्रदेशात निर्वासित म्हणून आश्रय घेतला.

येथील पुश्तू भाषा बोलणाऱ्या पठाणी टोळ्या (पख्तुन) कोणाचेही राजकीय दडपण न मानणाऱ्या स्वातंत्र्यप्रिय आहेत. पठाण जमाती परंपरागत कुळीचा अलिखित कायदा मानतात. ब्रिटिशांच्या काळात या प्रांतातील दोन-तृतीयांश भूभागात पठाणी टोळ्यांचे वर्चस्व होते. ब्रिटिशांनी या रानटी टोळ्यांना खंडणी देऊन शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्‍न केले होते. या भागास १९१९ मध्ये सरहद्द गांधी ⇨ अब्दुल गफारखान यांचे नेतृत्व लाभले. त्यानंतर त्यांचे पुत्र वलीखान नेते झाले. त्यांच्या खुदाई खिदमतगार संघटनेच्या चळवळीने भारत-पाकिस्तान विभाजनास विरोध केला आणि सार्वमतावर खुदाई खिदमतगारमधील नेत्यांनी बहिष्कार टाकला तथापि इतर मुस्लिम बहुसंख्यांकांनी पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घेतला. परिणामतः पख्तुनिस्तानच्या चळवळीने जोर धरला आणि पठाण स्वायत्ततेची म्हणजे पख्तुनिस्तानची मागणी करू लागले. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर ही चळवळ अधिक तीव्रतर करण्यात आली. काही पख्तुन नेत्यांना अटक करण्यात आली. तेव्हा १९५५ मध्ये पाकिस्तानची घटना बदलून सिंध, पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत ही घटकराज्ये पश्चिम पाकिस्तानात विलीन करण्यात आली. इस्लामी एकतेच्या नावाखाली पठाणांच्या स्वयंनिर्णयाच्या मागणीस शह देण्याचा पाकिस्तानचा डाव होता तथापि पख्तुनिस्तानची चळवळ ही अद्यापि पाकिस्तानातील एक समस्या आहे. अफगाणिस्तान या चळवळीस घुसखोर पाठवून तसेच शस्त्रास्त्रांचा पुरवठा करून सक्रिय मदत करीत आहे, असा पाकिस्तानी शासनाचा आरोप आहे.

या प्रांतातील पेशावर विद्यापीठ आणि पेशावर वस्तुसंग्रहालय या दोन महत्त्वाच्या शैक्षणिक क्षेत्रातील संस्था असून वस्तुसंग्रहालयात अनेक प्राचीन बौद्ध अवशेष आहेत. पुरातत्त्ववेत्त्यांना स्वात व युसुफझई जिल्ह्यांच्या परिसरात, विशेषतः पेशावरच्या सभोवतालच्या प्रदेशात, अनेक प्राचीन कला-अवशेष मिळाले. त्यांतून गांधार शैली दृग्गोचर होते. हे अवशेष छिन्नविछिन्न अवस्थेत असून पाषाणशिल्पांत प्रथमच बौद्ध मूर्ती आणि बौद्ध धर्मातील अनेक बोधिसत्त्वादिकांच्या मूर्ती आढळल्या. या मूर्तींवर पाश्चात्त्य विशेषतः ग्रीक कलेची छाप स्पष्ट दिसते. येथील स्तंभ प्रामुख्याने कॉरिंथियन स्तंभशीर्षे बसवून तयार केले होते. या शिल्पकलेचा काळ तज्ञांच्या मते इ. स. पू. पहिले शतक ते इ. स. चौथे शतक असा असावा. इ. स. ४७ मधील गाँडफेरनीज राजाचा एक शिलालेख या प्राचीन अवशेषांत उपलब्ध झाला असून ईश्वरप्रेरित टॉमसच्या कथेत राजाचा उल्लेख आढळतो.

पहा : अफगाणिस्तान गांधार शैली पख्तुन पाकिस्तान (इतिहास).

संदर्भ : 1. Burton, Sir William, India’s North – West Frontier, London,1959. 

           2. Davies, C. C. The Problem of the North-West Frontier –1890 – 1908, London, 1932.

           3. Spain, James, The way of the Pathanas, New York, 1962.

           4. Swinson, Arthur, North West Frontier, Bangalore, 1967.

 

देशपांडे, सु. र.