यांबोल : बल्गेरियातील याच नावाच्या प्रांताची राजधानी. लोकसंख्या ८४,५२८ (१९८२ अंदाज). हे शहर टुंजा नदीवर वसले आहे. विद्यमान शहराच्या उत्तर भागात काबिले येथील उत्खननात इ. स. पू. दुसऱ्या सहस्रकातील ब्राँझयुगीन वसाहतीचे अवशेष आढळले आहे. इ. स. पू. ३४२ – ३४१ मध्ये मॅसिडोनियाच्या दुसऱ्या फिलिप राजाने हे शहर जिंकले. इ. स. पू. ७२ मध्ये रोमन साम्राज्यातील थ्रेस परगण्यात ते समाविष्ट करण्यात आले. इ. स. चवथ्या शतकात येथे ख्रिस्ती बिशपचे धर्मपीठ होते. इ. स. सहाव्या शतकात मात्र हे धर्मपीठ नष्ट झाले. ११ ते १४ या शतकांत ‘डायम पलिस’ आणि पुढे तुर्की अंमलात (पंधरावे ते एकोणिसावे शतक) ते ‘यांबोली’ या नावाने ओळखले जाई. शहरात इतिहासकालीन दगडी मशिदीचे अवशेषही सापडतात. कापड, पादत्राणेनिर्मितीची यंत्रसामग्री, मृत्तिकाउद्योग, फर्निचर, अन्नप्रक्रिया, मद्यनिर्मिती इ. उद्योगधंदे शहरात विकसित झाले आहेत.

जाधव, रा. ग.