सेंट जॉन : कॅनडातील क्वीबेक प्रांतातून व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील मेन राज्यातून वाहणारी नदी. लांबी सु. ६७६ किमी. पाणलोट क्षेत्र सु. ५४,००० चौ. किमी. कॅनडाच्या क्वीबेक प्रांतातील लिटल सेंट जॉन व फ्रांटिल्टे सरोवरात उगम पावणारे प्रवाह एकत्रितपणे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील मेन राज्याच्या सॉमरसेट परगण्यसतील सेंट जॉन तलावात उगम पावणाऱ्या प्रवाहास मिळतात. यांचा संयुक्त प्रवाह म्हणजेच सेंट जॉन नदी होय. सेंट फ्रॅन्सिस या उपनदीच्या संगमानंतर सेंट जॉन ईशान्यवाहिनी होते. सेंट जॉन ग्रँड फॉल्सजवळ कॅनडाच्या न्यू ब्रन्सविक प्रांतात प्रवेश करते. येथे नदीपात्रात २३ मी. उंचीचा प्रपात तयार झालेला आहे. वुडस्टॉक जवळ ती पूर्वेकडे वळते व ऑरोमॉक्टोच्या संगमानंतर दक्षिणेकडे वाहत जाऊन फंडी उपसागरास मिळते. सेंट जॉन नदी तिच्या एकूण प्रवाहक्षेत्रातील सु. १३० किमी. अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा यांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून वाहते.

फ्रेंच समन्वेषक स्यूर दे माँ व साम्युएल द शांप्लँ यांनी या नदीचा शोध १६०४ मध्ये सेंट जॉन बिशपदिनी लावला. त्यामुळे ही नदी सेंट जॉन या नावाने ओळखली जाते. ॲलगॅश, सेंट फ्रॅन्सिस, मॅदवॉस्क, ऑरोमॉक्टो, टोबीक, नॅशवॉक, सॅमन या सेंट जॉनच्या प्रमुख उपनद्या आहेत. सेंट जॉन नदीवरील बीचवुड, मॅक्टाक्वॅक व ग्रँड फॉल्स येथे जलविद्युत्‌निर्मिती केंद्रे आहेत. नदीमुखापासून फ्रेडरिक्शनपर्यंत सु. १३७ किमी. मोठ्या जहाजांतून व वुडस्टॉकपर्यंत सु. २४१ किमी. लहान गलबतांमधून जलवाहतूक होते. तिच्या मुखाजवळ फंडी उपसागरातील उंच लाटांमुळे रिव्हर्सिंग फॉल्सची निर्मिती होते. यामुळे नदीचा प्रवाह दिवसातून दोन वेळा विरुद्ध दिशेने वाहतो. या नदीवर एडमन्स्टन, फ्रेडरिक्शन, सेंट जॉन ही प्रमुख शहरे आहेत.

गाडे, ना. स.