ओझर : (१) नासिक जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र. लोकसंख्या २१,२६० (१९७१). मुंबई – आग्रा महामार्गावर नासिकच्या ईशान्येस हे १९ किमी. आहे. रशियाच्या साहाय्याने मिग जातीच्या विमानांच्या बांधणीसाठी भारत सरकारने ओझरजवळ कारखाना उघडल्यामुळे ओझरला संरक्षणदृष्ट्या महत्त्व आले. किर्लोस्करांनी आपला ट्रॅक्टरचा कारखाना ओझरजवळच उघडल्याने ओझरला औद्योगिकदृष्ट्याही महत्त्व आले आहे.

(२) पुणे जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र. लोकसंख्या १,४१४ (१९६१). पुणे – नासिक महामार्गावरील नारायणगावापासून हे आठ किमी. उत्तरेस, कुकडी नदीकाठी असून येथील गणपतीची अष्टविनायकांत गणना होते. येथील मंदिर पेशव्यांनी बांधलेले आहे.

शाह, र. रू.