शाकल : प्राचीन भारतातील मद्र देशाची राजधानी. पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या झांग जिल्ह्यातील अपगा नदीवरील संगलवाल-टिबा म्हणजे ‘शाकल’ असावे, असे पुरातत्त्वज्ञ कनिंगहॅम यांचे मत आहे. काहींच्या मते चुनिओट किंवा शाक्कोट म्हणजे शाकल असावे. प्राचीन बौद्ध, जैन वाङमयातील तसेच प्राचीन व्यापारी मार्गांच्या उल्लेखांवरून रावी व चिनाब नद्यांदरम्यानचे साकल/सागल म्हणजे ‘शाकल’ असावे असे म्हटले जाते. डॉ.फ्लीट यांच्या मते चिनाब नदीवरील सियालकोट म्हणजे शाकल. या भागात प्रचलित असलेल्या पारंपरिक कथांमुळे या मताला पुष्टी मिळते.

ग्रीक इतिहासकारांनी शाकलचा संगल असा उल्लेख केलेला आढळतो. टॉलेमीने याचे ग्रीक रूपांतर यूथोडेमिया असे केले आहे तर बौद्ध जातकांमध्ये याचा उल्लेख सागल असा मिळतो. पांडवांचा चुलता राजा शल्य याने त्याची स्थापना केली, अशी पारंपरिक कथा आहे. त्याची ही राजधानी होती, असा महाभारतात उल्लेख मिळतो. मत्स्यपुराणातील उल्लेखानुसार सत्यवानाची पत्नी सावित्री हिचे शाकल हे जन्मस्थान होय. इ.स.पू. दुसऱ्या शतकात ग्रीक राजा डीमीट्रिअस याची व त्याच्यानंतर डायोनिसस, मीनांदर (मिलिंद) इत्यादींची राजधानी येथे होती. वायुपुराणातील उल्लेखानुसार या प्रदेशावर आठ यवन राजांनी सु. ८२ वर्षे राज्य केले होते. इ.स. ५१० मध्ये हूण वंशातील राजा मिहिरकुल याचीही राजधानी येथेच होती.

प्राचीन काळी सागला हे ‘तक्षशिला ते मथुरा’ या मार्गावरील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र होते. ठोक मालाची येथे मोठी बाजारपेठ होती. मिलिंदपञ्ह या पाली भाषेतील ग्रंथात याचा उल्लेख ‘पुटभेदन केंद्र’ (घाऊक मालाचे किरकोळ विक्री केंद्र) म्हणून आला आहे. मिलिंद राजाच्या काळात (इ.स.पू. १११ – ९०) काशी जनपदामध्ये तयार होणारी उंची व सुंदर वस्त्रे सागल येथे विक्रीसाठी जात. तेथे त्यांची मोठी दुकाने होती. सागल, कोसल व कुरु येथील राजघराण्यांतील व्यक्तींमध्ये वैवाहिक संबंध होते असे उल्लेख आढळतात.

पहा : मद्रदेश मीनांदर सियालकोट.

चौंडे, मा. ल.