कल्याण : ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आणि मध्यरेल्वेचे महत्त्वाचे प्रस्थानक. लोकसंख्या ९९,५४७ (१९७१). हे उल्हास नदीकाठी, मुंबईच्या ५४ किमी. ईशान्येस असून येथून मध्यरेल्वेचे पुणे व नासिककडे फाटे फुटतात. इ. स. पहिल्या शतकापासून कल्याणबाबत उल्लेख आढळतात. सागरी व्यापाराचे केंद्र आणि देशावर जाण्याच्या मार्गावरील महत्त्वाची पेठ म्हणून मोगल अमदानीतही कल्याणला सुभेदार होता. त्यावेळचा कल्याणजवळील दुर्गाडी किल्ला, मशिदी आणि १५९५ चे शेणाले तळे, तसेच कल्याण सुभेदाराच्या सुनेबाबतची शिवाजी महाराजांची कथा कल्याणचे महत्त्व दाखवितात. १८५५ साली येथे नगरपालिका स्थापन झाली. १९४७ नंतर निर्वासितांसाठी उल्हासनगरची स्थापना झाल्याने व कल्याणच्या परिसरात मोठमोठे अनेक उद्योग सुरू झाल्याने कल्याण झपाट्याने वाढले.

शाह, र. रू.