सांत्यागो दे कूव्हा : वेस्ट इंडीजमधील क्यूबा या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व बंदर तसेच याच नावाच्या प्रांताची राजधानी. लोकसंख्या ५,५५,८६५ (२०१२). क्यूबाच्या आग्नेय किनाऱ्यावरील सिएरा माएस्ट्रा या पर्वतश्रेणीच्या पायथ्याशी सुळक्यांमुळे निर्माण झालेल्या जवळजवळ भूवेष्टित उपसागराच्या किनाऱ्यावर हे शहर वसले आहे. एका लांबट व अरुंद चॅनेलद्वारे हा उपसागर कॅरिबियन समुद्राला जोडला गेला आहे. खोल व सुरक्षित सागरी बंदरामुळे सुरुवातीच्या काळातील समन्वेषक या बंदराकडे विशेष आकर्षित झाले होते. क्यूबाचा स्पॅनिश वसाहतीचा पहिला गव्हर्नर द्येगो बेलाथकेथ (कार. १५११–२४) याने या नगराची स्थापना केली (१५१४). १५२२ मध्ये शहराचे विद्यमान स्थान मूळ शहराच्या ठिकाणापासून काही अंतरावर हलविण्यात आले. बेलाथकेथने फ्रेंच व ब्रिटिश चाच्यांपासून बंदराचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने सिएरा माएस्ट्रा पर्वतश्रेणीतील ६०मी. उंचीच्या एका सुळक्यावर मोरो नावाचा किल्ला बांधला. वासाहतिक काळात उत्तर कॅरिबियन भागात लष्करी डावपेचांच्या दृष्टीने हे स्थान त्याला मोक्याचे वाटले. १५२२ ते १५८९ यांदरम्यान येथे क्यूबा वसाहतीची राजधानी होती. क्यूबाच्या अगदी पश्चिम भागातील हाव्हॅनाच्या उत्कर्षाबरोबर येथील लोकसंख्या पश्चिमेकडे स्थलांतरित झाल्यामुळे या नगराचे महत्त्व कमी झाले. एर्नांदो कोर्तेझ हा भू-संशोधक-समन्वेषक या नगराचा पहिला नगराध्यक्ष होता. त्याने १५१८ मध्ये येथूनच मेक्सिको जिंकून घेण्यासाठीची यशस्वी मोहीम आखली होती. सन १५५३ मध्ये फ्रेंच हल्लेखोरांनी हे नगर काबीज करून लुटले, तर १६६२ मध्ये ब्रिटिश चाच्यांनी पादाक्रांत केले तथापि स्पेनने आपली अधिसत्ता गमावली नाही. स्पॅनिश-अमेरिकन युद्घाची हीच प्रमुख रणभूमी होती. अमेरिकेने हे युद्घ जिंकून (१८९८) बंदराच्या परिसरातील बरेच स्पॅनिश लढाऊ आरमार निकामी केले. त्यानंतर या शहरावर अवचित सत्तांतरातून लष्करी हुकूमशाही अंमल आला. क्रांतिकारकांचा नेता फिडेल कास्ट्रो याने सांत्यागो येथील लष्करी छावणीवर अयशस्वी हल्ला केला (१९५३). त्यामुळे त्यास लष्करी शासनाने अठरा वर्षांची शिक्षा सुनावली पण ती पुढे माफ करण्यात आली (१९५४). तुरुंगातून बाहेर आल्यावर कास्ट्रोने अमेरिकेत आश्रय घेऊन आपल्या गनिमी कारवाईद्वारे १९५६ मध्ये सांत्यागो दे कूव्हा शहरास एकाकी पाडले आणि बातीस्ता या हुकूमशहाकडून सत्ता काबीज केली (१९५९). त्यानंतरच्या दोन दशकांत शहराची लोकसंख्या व येथील सेवा व्यवसायांत वेगाने वाढ झाली.

शहराचा परिसर शेती व खाणकाम व्यवसायासाठी महत्त्वाचा आहे. सिएरा माएस्ट्रा खोऱ्यात अनेक फळे व पिके होत असल्यामुळे त्यांची ही मोठी बाजारपेठ आहे. मँगॅनीज, तांबे व लोह या खनिजधातूंच्या खाणी शहराच्या परिसरात असल्यामुळे त्यांच्या शुद्घीकरणाचे कारखाने शहरात आढळतात. तद्‌वतच साखर, मद्यनिर्मिती, तंबाखूवरील प्रक्रिया, तेलशुद्घीकरण, वस्त्रनिर्मिती इत्यादींचे कारखाने व प्रक्रियाउद्योग शहरात चालतात. येथून तांबे, लोहखनिज, मँगॅनीज, साखर, तंबाखू, कॉफी, फळे व लाकूड यांची निर्यात होते. हे मध्यवर्ती महामार्गावरील तसेच क्यूबातील मुख्य लोहमार्गाचे दक्षिणेकडील अंतिम स्थानक आहे. सांत्यागोमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंट (१९४७) हे विद्यापीठ, एक वैद्यकीय विद्यालय, भव्य क्रीडांगण, कॅथीड्रल व अनेक लहानमोठी वस्तुसंग्रहालये आहेत.

देशपांडे, सु. र.