रिऊक्यू बेटे : ‘नान्से बेटे’ या नावानेही प्रसिद्ध आहेत. पश्चिम पॅसिफिक महासागरातीवल जपानच्या आधिपत्याखाली बेटे, जपानचे क्यूशू बेट व तैवान यांदरम्यान सु. १,०५० किमी. ईशान्य−नैर्ऋत्य पसरलेली ही बेटे लूचू, लिऊकिऊ या नावांनीही ओळखली जातात. यांच्या रांगेमुळे पूर्व चिनी समुद्र आणि फिलिपीन समुद्र (पॅसिफिक महासागराचे भाग) यांदरम्यानची नैसर्गिक सरहद्द बनली आहे. या द्वीपसमूहात सु. १०० बेटांचा समावेश असून भूभागाचे क्षेत्र ४,७९० चौ. किमी. आहे. या समूहाचे उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे आमामी, ओकिनावा व साकिशीमा असे प्रमुख तीन भाग पाडण्यात आले आहेत. त्यांपैकी आमामी गटात मुख्यत्वे ओ-शिमा, तोकारा, तोकूनो, ओकीएराबू, कीकाई इ., तर ओकिनावा गटात ओकिनावाशिवाय ई, ईहेया, कूमे, केरामा इ. बेटांचा समावेश होतो. साकिशीमा गटात मीयाको, इशिगाकी, इरीओमोटे इ. बेटे आहेत. या द्वीपसमूहातील ओकिनावा हे सर्वांत मोठे बेट असून नाहा (लोकसंख्या ३,०४,००–१९८५) हे या बेटावरील प्रमुख बंदर, व्यापारी व प्रशासकीय केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

ही बेटे म्हणजे पॅसिफिक महासागरातील प्रचंड पर्वतरांगांचे पाण्याच्या पृष्ठभागावर आलेले माथे आहेत. बहुतेक मोठ्या बेटांवक डोंगररांगा, टेकड्या, पठारे व जागृत ज्वालामुखी असून लहानलहान बेटे प्रवाळांनी बनलेली आहेत. काही बेटांवर अद्याप लोकवस्ती नाही. ६१० मी. पेक्षा जास्त उंचीची ठिकाणे येथे फारच थोडी आहेत. आमामी गटातील नाकानो बेटावरील ९८० मी. उंचीचे शिखर हे या द्वीपसमूहातील सर्वांत उंच ठिकाण आहे. येथील हवामान उपखंडीय प्रकारचे आहे. येथील वार्षिक सरासरी तापमान २१ से. व. पर्जन्यमान २१० सेंमी. पर्यंत असते. उन्हाळ्यात वारंवार टायफून (वादळे) होतात. बेटांवर अनेक विषारी सर्प, रानडुकरे, काळवीट व काळे ससे आढतात. येथील जंगलात मुख्यत्वे कापूर, वड, जपानी सीडार, पाईन इ. वृक्षप्रकार दिसून येतात. शेती व मासेमारी हे येथील लोकांचे प्रमुख व्यवसाय आहेत शेती उत्पादनांत प्रामुख्याने ऊस रताळी, केळी, अननस, सोयाबीन, भात इत्यादींचा समावेश असतो. आर्थिक दृष्ट्या मासेमारी हा महत्त्वाचा व्यवसाय आहे. येथील शेंदरी रंगाची लॅकर (लाख) चकचकीत नक्षीदार भांडी व निरनिराळ्या वस्तू बनविण्यासाठी फार प्रसिद्ध आहे. जपानच्या मुख्य बेटांवर लॅकरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. याशिवाय बेटांवर खाद्य पदार्थ, सुती कपडे, पनामा हॅट, मातीची भांडी, तंबाखूची उत्पादने इ. चे निर्मिती व्यवसाय असून बहुतेक उपभोक्ता उद्योग नाहा शहरात केंद्रित झाले आहेत. येथून मुख्यत्वे ऊस व डबाबंद अननस यांची निर्यात होते. रिऊक्यू बेटांवरील मूळ रहिवासी ⇨ऐनू लोकांशी मिळतेजुळते असून ते शुद्ध जपानी भाषेपेक्षा वेगळी भाषा बोलतात. शिक्षण व आरोग्य यांच्या दृष्टींनी या बेटावर अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून नाहा येथे १९५० साली अ. सं. सं. च्या सहकार्याने ‘रिऊक्यू विद्यापीठ’ स्थापन करण्यात आले आहे.

या बेटांवर फार वर्षांपूर्वी तिनसुनशी या देवपौत्राने स्वतंत्र राज्य स्थापन केले, अशी दंतकथा आहे. इ. स. ६०५ पासून चिनी लोकांनी या प्रदेशावर अनेकदा हल्ले केले परंतु बाराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत तिनसुन्शीच्या वारसदारांनी येथे आपली सत्ता टिकून ठेवली. त्यानंतर जपानमधून हद्दपार झालेल्या शुंतेन याने येथे वास्तव्य करून हळूहळू आपले वर्चस्व प्रस्थापित केले. १३७२ मध्ये चीननेही येथील काही भगावर अधिकार गाजविला. सोळाव्या शतकाअखेरीस कोरिया-जपान युद्धात येथील राजाने जपानच्या बाजूने लढण्याचे अमान्य केले. १६०० मध्ये सात्सूमा येथील जपानी राजाने या बेटांवर आक्रमण करून येथील राजाला कैद केले. त्यानंतर नियमित खंडणी देण्याच्या व जपानचे आधिपत्य मान्य करण्याच्या अटींवर त्याची सुटका करण्यात आली. चिनी लोकांपासूनही बचाव व्हावा महणून रिऊक्यूमधील लोकांनी जपान व चीन अशा दोघांनाही खंडणी देणे चालूच ठेवले. १८५३ मध्ये अमेरिकेच्या मॅथ्यू पेरी या नौदल अधिकाऱ्याने आपले सैन्य येथे उतरविले होते. १८७९ मध्ये ही सर्व बेटे जपानने ताब्यात घेतली व ओकिनावा (अर्थ-विस्तारित दोर) प्रांतात त्यांचा समावेश केला. याला चीनने विरोध केला. अखेर १८९५ मध्ये जपानने फॉर्मोसा घेतल्याने चीनने हा करार मान्य केला. विकासासाच्या दृष्टीने मात्र या बेटांकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. दुसऱ्या महायुद्धात या बेटांवर बाँब वर्षांवामुळे अतोनात जीवित हानी झाली. या महायुद्धात अमेरिका जपानचा पराभव करून आमामी, ओकिनावा आणि साकिशीमा हे प्रमुख हे प्रमुख द्वीपसमूह नाहा येथील अमेरिकन लष्करी गव्हर्नरच्या ताब्यात दिले. ओकिनावा द्वीपसमूहावर पॅसिफिक महासागरातील अमेरीकेचा प्रमुख नाविक तळ उभारण्यात आला. १९५१ च्या सॅन फ्रॅन्सिस्को येथील शांतता परिषदेत ही बेटे जपानच्या ताब्यात देण्याचे ठरले परंतु अमेरीकेने प्रत्यक्षात मात्र तोकारा बेटांव्यतिरिक्त इतर बेटांवरील आपला हक्क सोडला नाही. १९५३ मध्ये फक्त आमामी द्वीपसमूह जपानला परत देण्यात आला. १९६० साली व्हिएटनाम युद्धात अमेरीकेला या नाविक तळाचा मोठ्या प्रमाणात वापर करता आला. त्यानंतर जपानने इतर बेटे मिळविण्याविषयी अनेकदा मागणी केली. अखेर १९६८ मध्ये अ. सं. सं. ने रिऊक्यू मंत्रिमंडळात पाठविण्यासाठी परवानगी दिली मे १९७२ मध्ये अ. सं. सं. च्या सैन्याचा मर्यादित तळ येथे ठेवून परस्परांच्या संरक्षणाविषयीचा एक करार करण्यात येऊन रिऊक्यू द्वीपसमूह जपानच्या ताब्यात देण्यात आला.

चौंडे, मा. ल.