मृत समुद्र : जगातील अधिक क्षारता (साधारण इतर सागरजलापेक्षा ७ ते १० पटींनी अधिक क्षारता) असलेला व सस.पासून सु. ३९७ मी. पाण्याची पातळी खाली असलेला, इझ्राएल-जॉर्डन या देशांच्या दरम्यानचा एक नैसर्गिक जलाशय. ‘समुद्र’ या अपसंज्ञेने तो ओळखला जातो. त्याचा नैर्ऋत्य भाग इझ्राएलमध्ये व इतर भाग जॉर्डनमध्ये मोडतो. दक्षिण-उत्तर लांबी सु. ७४ किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी सु.१६ किमी. क्षेत्रफळ सु. ९३० चौ. किमी. संपूर्णपणे भूवेष्टित असलेल्या या समुद्रात प्राणिजीवन नसल्याने ग्रीकांनी त्यास मृत समुद्र असे नाव रूढ केले.

भूरचनादृष्ट्या हा समुद्र जॉर्डनच्या भल्या मोठ्या खचदरीचा भाग आहे. शास्रज्ञांच्या मते तृतीयक कालखंडातील पृथ्वीच्या हालचालींमुळे या समुद्राची निर्मिती झाली असावी, हे याच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंस असलेल्या डोंगररांगांच्या तीव्र कड्यांच्या अभ्यासावरून दिसून येते. पूर्वेस मोॲब डोंगरश्रेणी दक्षिण-उत्तर पसरलेली आहे. पश्चिमेस ज्यूडिया मरुप्रदेशातील डोंगर दिसतात. हा सर्व प्रदेश मरुभूमीचा वालुकामय, खडकाळ आणि दऱ्या-खोऱ्यांनी बनलेला आहे. काही ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आणि अस्फाल्टचे उद्रेक दिसून येतात. अधूनमधून नैसर्गिक वायूही बाहेर पडतो.

या समुद्राचे पाणलोट क्षेत्र सु. ४०,००० चौ. किमी. असावे. उत्तरेकडून समुद्राला मिळणारी जॉर्डन ही मुख्य नदी असून आर्नान व झार्का या इतर नद्या होत. येथे पाऊस पडलाच, तर पुष्कळसे पाणी जमिनीत मुरते समुद्रास ते क्वचितच मिळते. जॉर्डन नदीमुळे मृत समुद्राच्या पाण्याच्या पातळीत ३ ते ४ मी. पर्यंतच बदल होतो. समुद्राचे पूर्व व पश्चिम किनारे तीव्र, तर दक्षिण आणि उत्तरेकडील किनारे उथळ स्वरूपाचे आहेत. एल्. लिसॅन द्वीपकल्पामुळे समुद्राचे दोन भाग होतात. उत्तरेचा मोठा भाग व दक्षिणेतील लहान भागाचे वैशिष्ट्य म्हणजे सु. २० किमी. लांब असलेला साबखा दलदलीचा प्रदेश.

लवण, पोटॅश व ब्रोमीन एवढीच या समुद्रातून मिळणारी उत्पादने होत. सडोम व गमॉर ही प्राचीन शहरे याच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावर होती. विद्यमान सडोम येथे मीठ उत्पादन केले जाते. बायबलच्या जुन्या करारात खारा समुद्र, पूर्व समुद्र, मैदानी समुद्र, मृत्यूचा समुद्र अशी नावे या समुद्राला दिलेली आढळतात. अरबांचा समुद्र, अस्फाल्टचा समुद्र ही त्याची इतर नावे आहेत. अरब लोक त्यास नियतीचा सागर म्हणत. येथील कुमरान जवळच्या गुहांत ⇨ मृत समुद्र लेख आढळले आहेत. 

देशपांडे, चं. धुं.