राणीगंज : पश्चिम बंगाल राज्याच्या बरद्वान जिल्ह्यातील दगडी कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले औद्योगिक शहर. लोकसंख्या १,१९,३२२ (१९८१). हे आसनसोलच्या आग्नेयीस १५ किमी. वर असून दामोदर नदीच्या उत्तर काठावर व राणीगंज कोळसाक्षेत्राच्या मध्यभागी वसलेले आहे. इतर शहरांशी हे रस्त्याने जोडलेले असून पूर्व रेल्वेमार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक आहे.

हा प्रदेश बरद्वानच्या राणाकडे होता व त्याच्या नावावरून गावाला सांप्रतचे नाव पडले असावे. १७७४ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतील एस्. जी हीट्ली या नामवंत खाण संशोधकाने राणीगंज येथे देशातील पहिली कोळशाची खाण सुरू केली. या परिसरात १७७७ मध्ये एकूण सहा खाणी होत्या परंतु त्या वेळी येथील कोळसा कमी प्रतीचा आढळल्याने त्याला बाजारात फारशी मागणी मिळाली नाही. त्यामुळे १८१५ पर्यंत या खाण उद्योगाचा विकास होऊ शकला नाही.नंतर मात्र जोन्स या संशोधकाने येथील कोळशाचे पुन्हा संशोधन करून १८२० पासून या व्यवसायाचा हळूहळू विकास घडवून आणला. येथील कोळसा उत्पादनात १८५४ नंतर लक्षणीय वाढ झाली. १८५४ नंतर येथून रेल्वे वाहतूक सुरू झाल्याने कलकत्ता व अन्य ठिकाणच्या गिरण्या व कारखाने यांच्याकडे कोळसा पाठविणे सोयीचे झाले. येथील कोळसा पूर्व गोंडवन कल्पाच्या दामोदर मालेतील असून तो चांगल्या प्रतीचा मानला जातो. शिवाय तो जास्त कोकक्षम असल्याने कोक उत्पादनात व पर्यायाने पोलाद उत्पादनात अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. देशातील एकूण कोळसा उत्पादनाच्या ३०% ते ३५% उत्पादन राणीगंज व झरिया येथील खाणींतून मिळते.

राणीगंज हे प्रथम आसनसोल उपविभागाचे मुख्यालय होते परंतु १९०६ साली उपविभागीय दंडाधिकारी न्यायालय व मुख्यालय आसनसोलला हलविण्यात आले. १८५७ च्या उठावाच्या वेळी हे ईस्ट इंडियन रेल्वेचे अंतिम स्थानक होते. तापासी (सु. ४ किमी.), कालीपाऱ्ही (११ किमी.), उखरा (१२ किमी.), काजोरा (६ किमी.) ही राणीगंजच्या आसमंतातील महत्त्वाची खाणक्षेत्रे समजली जातात. कोळसा खाणींशिवाय याच्या परिसरात लोहखनिज, रसायने, कागद, सिमेंट, मृत्पात्री, काच, पोलाद, फरश्या, जडजवाहीर, लाख इ. उत्पादन-उद्योग विकसित झाले असून त्यांशिवाय सामान्य अभियांत्रिकी कारखाना, लोहमार्ग यंत्रशाळा तसेच भात, पीठ, तेलबिया यांच्या गिरण्याही आहेत.

गद्रे, वि. रा.