डेरा इस्माइलखान : पाकिस्तानातील द. वायव्य सरहद्द प्रांताच्या डेरा इस्मालखान जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ४९,२०० (१९७२). हे पेशावरच्या आग्नेयीस २४१ किमी. असून पेशावर–मुलतान लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. सिंधू नदीमुळे जुना गाव १८२३ मध्ये वाहून गेल्यावर नवीन गाव वसविण्यात येऊन १८६७ मध्ये तेथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. ही एक मोठी बाजारपेठ असून येथील लाखकाम, काचकाम, चटई विणकाम व हस्तिदंती काम प्रसिद्ध आहे. तसेच हे कापडनिर्मितीचे मोठे केंद्र आहे. नगरात दवाखाना, बागा व महाविद्यालये आहेत.

ओक, द. ह.