बेलो‌रशिया : रशियन संघराज्याच्या पंधरा प्रजासत्ताकांपैकी एक. क्षेत्रफळ २,०७,६०० चौ. किमी. लोकसंख्या ९४,५१,००० (१९७८). हे प्रजासत्ताक श्वेत रशिया म्हणूनही ओळखले जाते. याच्या वायव्येस लिथ्युएनिया, उत्तरेस लॅटव्हिया, ईशान्येस व पूर्वेस रशियन सोव्हिएट फेडरल सोशॅलिस्ट रिपब्लिक, दक्षिणेस युक्रेनियन प्रजासत्ताक ही रशियन राज्ये असून प‌श्चिमेस पोलंड देश आहे. मिन्स्क ही याची राजधानी (लोकसंख्या १२,७३,०००-१९७८) आहे.

 भूवर्षण : राज्याच्या उत्तर भागात हिमनद्यांच्या संचयाने बनलेले कमीअधिक उंचीचे कटक असून त्यांमध्ये बेलोरशियन रांग प्रमुख आहे. मिन्स्कजवळ राज्यातील सर्वांत उंच (३४६ मी.) डर्झिन्स्क पर्वत असून राज्याचा बराच भाग जंगलमय आहे. बरेझीन्स्कया मैदानी प्रदेश सर्वांत मोठा असून यास शेतीच्या दृष्टीने महत्त्व आहे. दक्षिणेकडे प्रिपेट नदीकाठी दलदलीचा प्रदेश असून तो दक्षिणेस युक्रेनियन वुडलॅंड व पूर्वेकडे नीपरच्या दलदलीपर्यंत पसरलेला आहे. या राज्यातून द्वीना (झापदनया), प्रिपेट, सॉझ, बग, बिरेझीन, नेमन, नीपर या नद्या वाहतात. द्वीना व नीपर या नद्या कालव्यांनी जोडल्याने त्या जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. या प्रदेशाच्या पश्चिम व उत्तर भागांत सु. ४,००० सरोवरे असून त्यांपैकी नरॉच, अस्व्हेअस्कॉय, ड्रीस्व्ह्याटी ही मोठी आहेत.

हवामान : राज्यातील हवामान खंडीय प्रकारचे बनले असून बाल्टिक समुद्रसान्निध्याचाही त्यावर परिणाम झालेला आहे. हिवाळ्यातीलव उन्हाळ्यातील सरासरी तापमान अनुक्रमे – ६० ते १८० से. असते. वार्षिक सरासरी वृष्टी ५५ ते ७० सेंमी. असते.

राज्याच्या उत्तरेकडील जंगलव्याप्त प्रदेशात फर, ओक, पाइन, स्प्रूस, भूर्ज (बर्च), तर दक्षिणेकडील जंगलांत ॲल्डर, ओक, हॉर्नबीम इ. वनस्पतिविशेष आढळतात. यातील बहुतेक वनस्पती व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. जंगलांत एल्क, हरिण, कोल्हा, एरमाइन, बिजू यांसारखे विविध प्रकारचे प्राणी आढळतात. तसेच फरच्या दृष्टीने महत्त्व असलेले ऊद मांजर व मिंक हे प्राणीही आढळतात. बदके, ग्राउझ, पाणलावा, वुडकॉक यांसारखे पक्षीही येथे दिसून येतात. नद्यांतून व सरोवरांतून विविध प्रकारच्या माशांची पैदास वाढविण्याचे प्रयत्न जारी आहेत.

इतिहास व राज्यव्यवस्था : इ. स. पहिल्या शतकात या प्रदेशात प्रथम स्लाव्ह लोकांनी वस्ती केली. नवव्या शतकात या लोकांची अलग अलग राज्या कीव्हच्या एका राज्यातच विलीन झाली. बाराव्या शतकाच्या शेवटी नदीकाठावरील प्रदेशात व्यापाराच चालना मिळून तेथे शहरे वसविण्यात आली. इ. स. १२४० मध्ये तार्तरांनी कीव्ह राज्याचा ताबा घेतला व हे राज्य लिथ्युएनियाच्या साम्राज्यात विलीन झाले. तेराव्या व चौदाव्या शतकांत या साम्राज्याची भरभराट झाली. पुढे लिथ्युएनिया व पोलंडमधील राजघराणी विवाहसंबंधाने जोडली गेल्याने १३८६ नंतर पोलंड-लिघ्युएनियाचे जोडराज्या अस्तित्वात आले.

सोळाव्या शतकात रशियाने यातील पूर्व भाग जिंकून घेतला. तसेच १६५६ च्या व्हिल्ना तहान्वये श्वेत रशियाचा भाग र‌शियाच्या अंमलाखाली आला. उर्वरित प्रदेश पोलंडच्या तीनदा (१७७२, १७९३ व १७९५) झालेल्या फाळण्यांमुळे रशियास मिळाला. यानंतरच्या काळात व्यापार, कारखाने, शेती इत्यादींचा विकास होऊन बेलोरशियाची प्रगती झाली. १८१२ मधील नेपोलियनच्या रशियावरील स्वारीत बेलोरशिया हे रणक्षेत्र बनले व त्याचे अत्यंत नुकसान झाले. हा प्रदेश आर्थिक दृष्ट्या मागे पडून १९१६ मध्ये जर्मनीच्या ताब्यात आला. तथापि १९१८ अखेर हा प्रदेश पुन्हा रशियास मिळाला परंतु पोलंड व रशिया यांच्यात युद्ध सुरू झाले. १९२१ च्या रीगा तहान्वये पोलंड-रशिया यांतील युद्धाचा शेवट होऊन बेलोरशियाचा पश्चिम भाग परत मिळाला. दुसऱ्या महायुद्धकाळात हा प्रदेश जर्मनांच्या अधिपत्याखाली होता (१९४१-४४). पुढे १६ ऑगस्ट १९४५ रोजी कर्झन रेषा ही बेलोरशिया व पोलंड यांची सरहद्द ठरविण्यात आली.

बेलोरशिया हे फेब्रुवारी १९३७ च्या घटनेनुसार सार्वभौम प्रजासत्ताक असले, तरी अंतिम ‌सत्ता सोव्हिएट संघराज्याकडेच आहे. एप्रिल १९७८ पासून नवीन घटना अंमलात आली. कारभाराच्या सोयीसाठी राज्याचे मिन्स्क, व्हीटेप्स्क, गोमेल, ब्रेस्त, ग्रॉडूनॉ, मगील्यॉफ हे विभाग केलेले आहेत. अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, सचिव व ११ सभासद यांचे बनलेले राज्याचे प्रेसिडियम असते. सुप्रीम सोव्हिएटला जबाबदार असलेले मंत्रिमंडळ हे सर्वोच्च कार्यकारी मंडळ आहे. संयुक्त राष्ट्रांचे हे सदस्य आहे.

सर्वोच्च न्यायालय व इतर कनिष्ठ न्यायालयांमार्फत न्यायदानाचे काम केले जाते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक सुप्रीम सोव्हिएटमार्फत पाच वर्षांसाठी केली जाते.


आर्थिक स्थिती : राज्यात शेती व्यवसायावर बहुसंख्य लोक अवलंबून असून लागवडयोग्य क्षेत्राच्या ६०% जमीन पिकांखाली आहे. येथे साम्यवादी प्रणालीनुसार सामूहिक व सहकारी शेती चालते. शेतीत आधुनिक तंत्रांचा व अवजारांचा वापर केल्याने दर हेक्टरी उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. राय, ओट, बार्ली या प्रमुख पिकांशिवाय साखर, बीट, बटाटे, फ्लॅक्स (अळशी तंतू) ही पिकेही घेतली जातात. बटाटे व भाजीपाला यांचे उत्पादन देशाच्या एकूण उत्पादनाच्या १५% आहे. या प्रजासत्ताकाचा उत्तर भाग हा फ्लॅक्सच्या लागवडीसाठी अग्रेसर असून देशाच्या उत्पादनाच्या २०% व जागतिक उत्पादनाच्या १५% उत्पादन येथे होते. दक्षिण भागात हेंपचे उत्पादन मोठ्या प्रमाणात काढले जाते. राज्यातील १९७७ मधील काही प्रमुख पिकांचे उत्पादन (हजार टनांत) : अन्नधान्ये ६,६१८ साखर बीट १,३५६ बटाटे ११,३१४ भाजीपाला ६३७ फ्लॅक्स १०५.

गुरे पाळणे, दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन हे व्यवसायही विकसित झालेले आहेत. राज्यात १९७८ मधील पशुधन (हजारात) : गुरे ६,७०५, मेंढ्या ५५९ डुकरे ४,५६७ होते.

दुसऱ्या महायुद्धानंतर अवजड उद्योग, रासायनिक पदार्थ, तेलशुद्धीकरण इ. उद्योगांचा विकास झाला. अवजड यंत्रसामग्रीनिर्मितीत हे राज्य आघाडीवर असून मिन्स्क, गोमेल, मनील्यॉफ, ही शहरे या दृष्टीने प्रसिद्ध आहेत. रसायनउद्योग ग्रॉड्‌नॉ, सल्येचनगॉर्स्क, गोमेल या शहरांत विकसित झालेला असून रबर उत्पादने, प्लॅस्टिक, पोटॅश खत, उष्णताप्रतिबंधक काचेच्या नळ्या इ. उत्पादनांसाठी हे राज्य महत्त्वाचे आहे. लाकूडउद्योगही मोठ्या प्रमाणात चालत असून पुठ्ठे व विविध प्रकारची कागदनिर्मिती केली जाते. यां‌शिवाय शिवणयंत्रे, रेडिओ, दूरदर्शनसंच, घड्याळे, लोकरी व सुती कापड, शेतीची अवजारे, अन्नप्रक्रिया इ. उद्योगही विकसित झालेले आहेत.

येथे पीट, चुनखडक, फॉस्फेट, डोलोमाइट इ. खनिज पदार्थ सापडतात. पीटचे साठे जास्त असून उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. पॉलस्क विभागातील खनिज तेल साठ्याच्या शोधामुळे तेलशुद्धीकरण उद्योगाची चांगली प्रगती झाली आहे. पॉलस्क, मझिर येथील तेलशुद्धीकरण कारखाने मोठे आहेत.

राज्यात १९७७ मध्ये ५,५०० किमी. लांबीचे लोहमार्ग व ७१,२०० किमी. लांबीच्या सडका असून हवाई वाहतुकीचीही चांगली सोय आहे. जलवाहतुकीसाठी हे राज्य अग्रेसर असून गोमेल, बब्रूईस्क, बरीसफ व पीन्स्क ही प्रमुख नदीबंदरे आहेत.

बेलोरशियात १९७० च्या जनगणनेनुसार ८१% लोक बेलोरशियन, १०.४% रशियन, ४.३% पोल, २.७% युक्रेनियन व १.६% ज्यू होते. १९७७ मधील दर हजारी जननमान व मृत्युमान अनुक्रमे १५.८ व ९ होते. औद्योगिक प्रगतीमुळे शहरांकडे लोकांचा ओढा असल्याचे दिसून येते.

येथे प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असून बहुसंख्य लोक साक्षर आहेत. १९७७-७८ मध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष माध्यमिक शाळांत १६ लक्ष ३१ उच्च शिक्षणसंस्थांत १,६७,८०० १३२ तांत्रिक महाविद्यालयांत १,६२,२०० विद्यार्थी होते. १९२८ मध्ये स्थापन झालेल्या बेलो‌रशियन शास्त्र अकादमीच्या ३२ संस्थांत, ४,८९२ शास्त्रज्ञ आहेत. राज्यात १९७७ मध्ये १८६ वर्तमानपत्रे होती, त्यांपैकी १२८ बेलो‌रशियन भाषेतील होती. राज्यात १९७७-७८ मध्ये ३०,२०० डॉक्टर आणि १,१४,७०० रुग्णशय्यांची सोय होती.

राज्यात कीव्ह व रूस काळातील ऐतिहासिक वास्तू आढळतात. चौदाव्या व सोळाव्या शतकांतील बरोक वास्तुशैलीचे नमुने अद्यापही अनुक्रमे पॉलत्स्क, स्थॅन्कोव्हीची, ग्रॉड्‌नॉ इ. शहरांतून आढळतात.

तेराव्या शतकापासून बेलो‌रशियन साहित्यपरंपरा आढळते. एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतील यांका क्युपाला (१८८२-१९४२) व ८२२ याकुब कोलास (१८८२-१९५६) हे कादंबरीकार उल्लेखनीय आहेत. झेलय्‌का (१९०८), झाल्टरी प्लेयर (१९१०), रोड ऑफ लाइफ (१९१३) या क्युपालाच्या, तर सॉंग्ज ऑफ सॉरो (१९१०), रेनेगडे (१९३१) इ. कोलासच्या प्रसिद्ध कादंबऱ्या होत. संगीतक्षेत्रात ई. ए. ग्लेबॉव्ह, व्ही. ए. झोलोटार्‌ह, एन्‌. आलादोव्ह यांनी मोलाची भर घातली असून बेलो‌रशियन स्टेट सिंफनी ऑर्केस्ट्रा प्रसिद्ध आहे. बुल्बा, ल्याव्हॉनिखा यांसारखे परंपरागत नृत्यप्रकार लोकप्रिय आहेत.

वर्तक, स. इ. गाडे, ना. स.