महोबा : उत्तर प्रदेश राज्यातील इतिहासप्रसिद्ध शहर व हमीरपूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १८,१९६ (१९८१). हे कानपूर-सागर रस्त्यावर आणि झाशी-माणिकपूर लोहमार्गावर वसले आहे. केकपुर, पाटनपुर अशा नावांनी प्राचीन काळी त्याचा निर्देश होई ⇨ चंदेल्ल  घराण्याची ही नंतरची दुसरी (नववे-चौदावे शतक) राजधानी. त्यावेळी ‘महोत्सवपुर’ या नावानेही ते ओळखले जाई. कुत्बुद्दीन ऐबकाने तेराव्या शतकाच्या प्रारंभी (१२०२) चंदेल्लांचा पराभव करून हे शहर ताब्यात घेतले पण अल्पावधीतच चंदेल्लांनी ते परत मिळविले, पुढे अलाउद्दीन खल्जीने स्वारी करून महोबा राजधानीसह चंदेल्लांचा बहुतेक प्रदेश काबीज केला (१३०५).

येथील १४ राण्यांचे सतीस्मारक, मदनसागर तलाव, शिवमंदिर, मदारी विष्णुमंदिर इ. प्राचीन स्थळे प्रसिद्ध असून ऐतिहासिक वास्तूंतील शिल्पकाम कलात्मक मानले जाते.

महोबा येथे मोहाची फुले, तूप, विड्याची पाने, धान्य इत्यादींचा व्यापार चालतो. आठवड्यांचे धान्यबाजार, गुरांचे बाजार व पानांचे बाजार प्रसिद्ध आहेत. श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. त्याशिवाय किरात सागर या सरोवराच्या काठावरील काजली याची यात्रा व गोखर टेकडीवरील सिद्ध यात्रा ह्या प्रसिद्ध आहेत.

देशमुख, वि. मा.