वेक्सफर्ड : आयर्लंड प्रजासत्ताकातील याच नावाच्या परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ९,५३७ (१९९१). हे डब्लिनच्या दक्षिणेस ११२ किमी. स्लेनी नदीच्या मुखाजवळ वसलेले आहे. नवव्या शतकातील वॅस्‌फ्योर्ड या डॅनिश वसाहतीवरुन वेक्सफर्ड हे नाव आले आहे. अँग्लो-नॉर्मन आक्रमणाच्या वेळी हे लष्करी दृष्टया महत्त्वाचे ठरले. इ. स. १३१७ मध्ये या नगराला सनद मिळाली. याचे अधिकार १४११ मध्ये चौथा हेन्री व १५५८ मध्ये पहिली एलिझाबेथ यांनी वाढविले. ऑलिव्हर क्रॉमवेल याच्या सैन्याने १६४९ मध्ये या नगराला वेढा घालून हे लुटले. वेक्सफर्ड १७९८ मध्ये आयरिश बंडखोरांचे मुख्य ठाणे होते. १८४६ मध्ये यास दुसरी सनद देण्यात आली.

  नगरातील प्राचीन अवशेषांपैकी जुन्या भिंती व पूर्वीच्या पाच मनोऱ्यांपैकी एक मनोरा अद्याप पहावयास मिळतो. प्रॉटेस्टंट चर्च व त्याजवळच सेंट सेपल्कर ॲबी (उपासनागृह) यांचे अवशेष येथे आहेत. स्लेनी नदीमुखखाडीवरील वेक्सफर्ड बंदर नदीत साठलेल्या गाळामुळे निरुपयोगी झाले आहे. १९०६ मध्ये १३ किमी. वरील रॉस्लेअर येथे कृत्रिम बंदर बांधले जाऊन ते वेक्सफर्डशी रस्ते व लोहमार्गाने जोडण्यात आले. या बंदरातून प्रामुख्याने पशुधन व कृषिउत्पादने निर्यात केली जातात. कृषिउत्पादनांवर आधारित व हलके अभियांत्रिकी उद्योग तसेच मोटारगाडयांचे उत्पादन येथे चालते. लोकरी कपडे, कृषी यंत्रे, लाकडी सामान, खनिजजल, खारवलेले डुकराचे मांस ही येथील मुख्य उत्पादने आहेत. सामन मासेमारीसाठी वेक्सफर्ड महत्त्वाचे आहे. जवळच असलेल्या फर्न्झ गावाच्या रोमन कॅथलिक बिशपचे हे मुख्य ठिकाण आहे. येथील सेंट पॅट्रिक चर्च व जुने ‘बुल रिंग’ (बैलांच्या झुंजींचे ठिकाण) उल्लेखनीय आहे.                           

चौधरी, वसंत