लुंगी : सिएरा-लेओनमधील पोर्टलोको जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रसिद्ध असलेले एक छोटे गाव. लोकसंख्या २,०७१ (१९६१). अटलांटिक महासागराच्या किनारपट्टीवरील फ्रीटाउनच्या उत्तरेस सु. १६ किमी.वर ते सिएरा-लेओन खाडीमुखापाशी वसले आहे. रोकेल किंवा सेली नदीच्या मुखाकडील भागाने ते फ्रीटाउनपासून विलग झाले आहे. फ्रीटाउनच्या परिसरात डोंगराळ भूप्रदेश असून विमानतळास उपयुक्त सपाट पठार नाही. शिवाय पाण्यालगतच्या खोलगट भागात धुक्याची शक्यता जास्त म्हणून लुंगीचा पठारी पट्टा विमानतळासाठी उपयोगात आणण्यात आला आहे. तेथे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे धुके फार काळ टिकून राहात नाही. त्यामुळे बाराही महिने विमानवाहतूक सुकर होते. लष्करी दृष्ट्याही या विमानतळास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दूरवर असलेल्या गावी रस्त्यांनी व जलमार्गांनी लाँचमधून जाता येते. प्रत्यक्षात विमानतळ लुंगी गावाच्या आग्नेयीस सु. ५ किमी.वर आहे. याचा १९६८ मध्ये विस्तार करण्यात आला. विद्यमान हवाई वाहतूक पट्ट्याची लांबी दोन किमी. असून रूंदी सु. ५० मी. आहे. विमानतळाच्या परिसरात नियंत्रणकक्ष, वेधशाळा, विश्रांतिगृहे, अग्निशामक तळ, रुग्णालय इ. सुविधा उपलब्ध आहेत.

देशातील या एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सु. ११ आंतरराष्ट्रीय कंपन्या वाहतूक करतात. अंतराधिक्यामुळे शहराच्या पूर्वेस असलेल्या न्यूटन या ठिकाणी नवीन विमानतळ बांधावा, अशी एक योजना विचाराधीन आहे. लुंगीशेजारील किशी धक्क्यावर मच्छीमारीचा मोठा उद्योग चालतो. या धक्क्यावर बोटींना इंधन पुरविण्याचीही सोय आहे. फ्रीटाउनमधून जलमार्गाने आल्यास येथेच होडीने प्रथम उतरावे लागते.  

संदर्भ : 1. Church, R. J. H. West Africa, London, 1980.

           2. Dalton, K. G. A. Geography of Sierra-Leon, Cambridge, 1965. 

देशपांडे, सु. र.