गोवर्धन पर्वत : उत्तर प्रदेश राज्यातील श्रीकृष्णचरित्रप्रसिद्ध पर्वत. हा मथूरेच्या पश्चिमेस २३ किमी. नैर्ऋत्य ईशान्य ८ किमी. पसरलेला असून याची दंडवती परिक्रमा १९ किमी.ची आहे. हा वालुकाश्माचा असून सपाट गाळमैदानात एकदम सु. ३० मी.वर आलेला दिसतो. याच्या चढाच्या मध्यावर गोवर्धन हे ९,५६८ (१९७१) लोकवस्तीचे नगर आहे. श्रीकृष्णाने याला आपल्या करंगळीवर उचलून धरून त्याखाली व्रजवासीजन व त्यांची गायीवासरे यांस आश्रय देऊन इंद्राने रागावून पाडलेल्या मुसळधार पावसापासून सात अहोरात्र त्यांचे रक्षण केले अशी पुराणातील कथा आहे. याच्यावरील कोवळे गवत व पाने इत्यादींवर गायी पुष्ट होतात म्हणून त्याला गोवर्धन हे नाव पडले. हा हिमालयाचा किंवा द्रोणाचलाचा तुकडा असावा अशी पुराणकथा असली, तरी तो अरवलीचा पृथक्‌स्थित दिसतो. वल्लभ संप्रदायाचे उपास्यदैवत श्रीनाथजी यांचे मंदिर या पर्वतावर आहे. जतपुऱ्यात याचे सर्वोच्च शिखर असून तेथे श्रीनाथजीचा आविर्भाव झाला असे म्हणतात. येथे मानसीगंगा नावाचे मोठे कुंड आहे. अंबरचा राजा भगवानदास याने अकबराच्या कारकीर्दीत तेथे हरीदेवाचे प्रेक्षणीय मंदिर बांधले. गोवर्धनावर प्रतिवर्षी कार्तिकात गोवर्धनपूजा व अन्नकूट असे मोठे उत्सव होतात. गोवर्धनाच्या परिसरात गोविंदस्वामीचा कदमखंडी, सूरदासची परसोली, कृष्णकुंड, राधाकुंड इ. पवित्र स्थळे आहेत.

कांबळे, य. रा.