ग्वाइरा : सेतकेदश. दक्षिण अमेरिकेतील अपर पाराना नदीवरील प्रसिद्ध प्रपात. हा ब्राझील-पॅराग्वाय सरहद्दीवर असून पोर्तुग्वाइराच्या थोडे दक्षिणेस आणि आसूनस्यॉनच्या ईशान्येस ३५४ किमी. आहे. पाराना नदी जेथे सेरा दी मराकाझू ही पर्वतश्रेणी भेदून जाते, तेथे नदीचे पात्र अरुंद होऊन ती निदरीतून वाहते. त्यामुळे हे प्रपात तयार झाले आहेत. जरी प्रत्यक्ष अठरा प्रपात असले, तरी ‘सप्त प्रपातांची झेप’ अशा अर्थाच्या नावाने ते ओळखले जातात. सर्वांत उंच प्रपात ३० मी. उंचीचा आहे. प्रपातांच्या वरच्या बाजूस नदीने पाच किमी. रुंदीची तीन सरोवरे तयार केली असून नायगारा धबधब्याच्या दुपटीहून अधिक पाणी यांतून वाहते. एवढा पाण्याचा साठा वाहत असलेले प्रपात जगामध्ये हेच आहेत. सेकंदाला १३,२०० घ. मी. पाणी यांतून वाहते. प्रपातांचा घनगंभीर आवाज ३२ किमी. लांब ऐकू येऊ शकतो. पर्यंटकांसाठी येथे लोहमार्गांची व जलमार्गांची सोय आहे. प्रपातांचे दृश्य सतत दिसणाऱ्या इंद्रधनुष्यामुळे पाहण्यासारखे असून त्यांची संभाव्य जलविद्युत्‌शक्ती प्रचंड आहे.

कांबळे, य. रा.