मानव भूगोल :मानव आपल्या बुद्धिमत्तेने व कुशलतेने सभोवार नैसर्गिक व मानवकृत पर्यावरणाचा कसा उपयोग करून घेतो, याचा अभ्यास करणारे शास्त्र. गेल्या शतकातील ‘प्राकृतिक व मानव’ अशा भूगोलशास्त्राच्या विभाजनात या शास्त्राचा उगम दिसून येतो. त्या काळातील पाश्चात्त्य औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळे ‘मानवाचा निसर्गावर विजय’ या विचाराने भूगोलवेत्त्यांचे व इतर तज्ञांचे मन भारले गेले. तत्कालीन व काही नंतर प्रसिद्ध झालेले ग्रंथ, तसेच शालेय, विद्यापीठीय पाठ्यपुस्तके यांमधून व अध्यापनातून हा विचार स्पष्ट उमटलेला दिसतो. अनेक अज्ञात प्रदेशांचे शोधन व ज्ञात प्रदेशांचा अभ्यास यांमुळे ‘मानवावर निसर्गाचा पूर्ण प्रभाव असतो’, ही विचारसरणी त्या काळातच मांडली गेली. पण हे दोन्ही विचार आता जवळजवळ नाहीसे होऊन ‘मानव – पर्यावरणसंबंधात मानव कितीही बुद्धिमान व चतुर असला, तरी तो जीवसृष्टीचा एक घटक असल्याने त्याने निसर्गाशी मिळते-जुळते घेतले पाहिजे’, ही जाणीव शास्त्रज्ञांमध्ये प्रकर्षाने येऊ लागली आहे, हे विद्यमान मानव भूगोलशास्त्रात दिसून येते.

उगम व वाढ : या शास्त्राचा पाया घालण्याचे श्रेय फ्रेंच भूगोलतज्ञ पॉल व्हीदाल द ला ब्लाश (१८४५–१९१८) यांना दिले पाहिजे. त्यांचा ‘मानव भूगोलशास्त्राची तत्त्वे’ (१९११ इंग्लिश अनुवाद) हा अद्यापिही एक आधारभूत ग्रंथ मानला जातो. पुढे झां ब्रुने (१८६९–१९३०), आल्बेअर दमॉन्‌झॉन (१८७२–१९४०), सॉर् अशा तज्ञांनी ‘व्हीदाल परंपरे’ त भर घातली.

एकोणिसाव्या शतकातच फ्रीड्रिख हाइन्‌रिख अलेक्झांडर फॉन हंबोल्ट (१७६९–१८५९), कार्ल रिटन (१७७९–१८५९), फेर्दिनांट फोन रिख्थोफेन (१८३३–१९०५) यांसारख्या जर्मन संशोधकांचे लक्ष भूरचना, हवामान, अज्ञात प्रदेशांचे शोधन आणि अज्ञात व ज्ञात प्रदेशांचे पद्धतशीर वर्णन यांवर वेधले गेले. या प्रभावाखाली फ्रीड्रिख राटसेलने (१८४४–१९०४) ‘मानव हा निसर्गाचा बंदा गुलाम आहे’ या नियतिवाद तत्त्वाचा ठामपणे पुरस्कार केला. प्रत्युत्तरादाखल ‘निसर्ग अनेक तऱ्हेची संपदा उपलब्ध करून देतो त्याचा उपयोग करून घेण्याची शक्यता मानवाचा प्रयत्न, कौशल्य व समजूतदारपणा यांवर अवलंबून असते’ हा ‘शक्यतावाद’ फ्रेंच तज्ञांनी मांडला. तथापि ब्रिटिश. जर्मन, अमेरिकन तज्ञांनी या युक्तिवादाकडे द्यावे तितके लक्ष दिले नाही. यास एक उल्लेखनीय अपवाद म्हणजे अमेरिकन विद्वान जॉर्ज पर्किन्स मार्श (१८०१–१८८२) हा होय. त्याने आपल्या मॅन अँड नेचर (१८६४) या ग्रंथात मानव–पर्यावरणासंबंधीचे मार्मिक व सुंदर वर्णन केलेले आढळते.

नियतिवादास विशेष प्रसिद्धी श्रीमती एलेन चर्चिल सेंपल (१८६३–१९३२) या अमेरिकन भूगोलवेत्तीने केलेल्या राटसेलच्या ग्रंथाच्या अनुवादाने मिळाली. या कट्टर दृष्टिकोनाचे स्वरूप ग्रिफिथ टेलर यांच्या ग्रंथात आढळून येते. हर्बर्टसन, लॉइड, जे. एफ्. हर्बर्ट, मेरी न्यूबिगिन ह्यांसारख्या इंग्लिश तज्ञांनी मानवाच्या कर्तव्याची नोंद घेतली पण त्यांचा कल निसर्गाच्या प्रभुत्वाकडे होता. एल्‌स्वर्थ हंटिंग्‌टन (१८७६–१९४७) या अमेरिकन तज्ञाच्या लिखणात नियतिवादाचा जोरदार पुरस्कार केल्याचे दिसून येते. नियतिवाद आणि शक्यतावाद या दोहोंमधील मध्यममार्ग साधण्याचा प्रयत्न ओ. ए. एच्. स्पेट यांनी आपल्या ‘संभवनीयता वादा’त (निसर्ग व मानव यांच्या संबंधात अनेक सुसंधी मिळण्याचा संभव असतो.) मांडला, पण त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

सोव्हिएट रशिया हे राष्ट्र उदयास आल्यावर या विचारांना एक नवी कलाटणी मिळाली. ‘निसर्ग संपन्न आहे पण मानवाने आपल्या परिश्रमाने, विज्ञानाच्या साहाय्याने, कौशल्याने व दूरदृष्टीने या संपदेचा उपयोग केला पाहिजे. इतकेच नव्हे, तर तीत भर घातली पाहिजे’, अशी जोरदार भूमिका बर्ग, पॉलिनॉव्ह, कोलोसॉव्हस्की, गेरासेमाव्ह, रायब्‌चिकोव ह्या रशियन तज्ञांनी मांडली. आज सोव्हिएट प्रादेशिक विकास योजना साधण्यात हे उद्दिष्ट चांगल्या प्रकारे दिसून येते.

वाढत्या समाजसत्तावादाचा जागतिक प्रभाव पाश्चात्त्य भांडवलशाही-लोकशाही राष्ट्रांवर पडल्याशिवाय राहिला नाही. बेकारी, वर्णसंघर्ष, प्रादेशिक असमतोल व विशेषतः ‘तिसऱ्या जगा’तील दारिद्र्य या घटनांचा झालेला प्रभाव आता पाश्चात्त्य शास्त्रज्ञांवर उमटलेला दिसतो हे भूगोलशास्त्रात डेव्हिड स्मिथ, हार्व्ही, अलेक्झांडर फोन बुंगे (१८०३–१९००) अशा तरूण पिढीतील तज्ञांच्या लिखणांत व्यक्त होते. अलीकडे प्रसिद्ध होत असलेल्या अमेरिकन अँटिपोड या नियतकालिक प्रकाशनातही हा प्रभाव दिसून येतो.


या तज्ञांचा मुख्य हेतू सांख्यिकीय पद्धतींचा भरपूर वापर, प्रतिमाने, नियम शोधन यांवर असला, तरी ‘निसर्गाची मानवावर अंतिम छाप पडते’, हा विचार हार्व्ही, चॉर्ली, हॅगेट, विगले यांच्या लिखाणांतून व्यक्त होताना आढळतो. हे खरे मानावयास हरकत नसावी, कारण जगद्व्यापी निसर्गघटकांचा प्रभाव नाकारता येत नाही. शिवाय शास्त्रातील कार्यकारणमीमांसेत ही विचारश्रृंखला असणे अपरिहार्य ठरते. पण याचा अर्थ नव्हे की, निसर्गाचे प्राबल्य एवढे आहे की ‘वृत्तीय प्रदेशातील जनसमूह नेहमी मागासलेले राहणारच अथवा पाश्चात्त्य साम्राज्यशाही आणि वसाहतवाद या घटना निसर्गनियमानुसारच आहेत’. नियतिवादाचे जहाल स्वरुप जर्मन भूगोलवेत्ता कार्ल हाउशोफर (१८६९–१९४६) याच्या भूराजनीतिशास्त्रविषयक विचारांत दिसून येते व त्याचा हिटलरने कसा दुरुपयोग केला, हे परिचित आहे.

उद्दिष्ट : वास्तविक ‘नियती’ आणि ‘शक्यता’ (व त्यांचे भावंड ‘संभवनीयता वाद’) यांतील विचारसंघर्ष आता अप्रासंगिक व कालबाह्य झाला आहे. कारण भूगोलशास्त्राचा दृष्टिकोन व उद्दिष्ट ही दोन्ही बदललेली आहेत. हे शास्त्र आता केवळ वर्णनात्मक व अज्ञात प्रदेश संशोधनात्मक राहिले नसून ‘कोणत्याही छोट्या-मोठ्या प्रदेशांत मानवपर्यावरणात असलेल्या असंख्य व सदोदित बदलत जाणाऱ्या संबंधांचे पद्धशीर विश्लेषण व यथायोग्य विवेचन’, हे या शास्त्राचे मुख्य उद्दिष्ट बनले आहे.

व्याप्ती : मानव भूगोलशास्त्राची व्याप्ती वाढत असून पर्यावरणाशी निगडित असलेल्या बहुविध सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांचा–प्रादेशिक दृष्ट्या त्यांचे क्षेत्रीय वितरण, प्रकार, आकृतिबंध व प्रसरण आदींचा–अभ्यास करणे व त्यातील निष्कर्षांनुसार इष्ट व शक्य स्वरूपाच्या उपाययोजना सुचविणे, यांकडे तज्ञांचे लक्ष वेधले गेले आहे. अशा अभ्यासांतून अनुभवजन्य सर्वसाधारण कल्पना व अनुमाने निघतात का? त्याही पुढे क्रिस्टलरच्या ‘केंद्रीय वस्ती सिद्धांता’ प्रमाणे भूगोलशास्त्रात इतर सिद्धांत शोधण्याकडे आपली मजल गाठण्याचे तज्ञांचे प्रयत्न चालू आहेत. अखिल पृथ्वी व मानवी कार्य ही या शास्त्राची अभ्यासव्याप्ती व अनेक विशिष्ट उपांगाद्वारे हा अभ्यास करणे, हे संशोधन साधन.

उपांगे : या व्याप्तीत अनेक उपांगे वाढत आहेत व नवी उद्‍भवत आहेत. ‘वसती भूगोलशास्त्रा’ त खेडी व शहरे यांचा अभ्यास सखोल होत असून ‘शहरी भूवर्णनशास्त्रा’ त उल्लेखनीय प्रगती झाली आहे. बेसुमार जनसंख्यावाढीचे इतके प्रश्न आहेत की, ‘जनसंख्या भूगोल’ हे नवीन महत्त्वाचे उपांग निर्माण झाले आहे. ‘कृषिभूगोला’त केवळ भूमि-उपयोगांचे प्रकार एवढाच मर्यादित विषय राहिला नसूनमृदांचे प्रादेशिक वितरण, उत्पादनशक्ती, निरनिराळ्या पिकांचे संयोजित वर्धन, धान्योत्पादन व स्थानिक रहिवाशांसाठी लागणारे अन्नघटक यांवरही भर दिला जात आहे. ‘औद्योगिक भूगोला’त हातमाग, गिरण्या अशा उद्योग घटकांच्या वितरणाबरोबर त्यांच्या स्थानिकीकरणाबाबत निकष शोधले जात आहेत. प्रगत व अप्रगत राष्ट्रांमधील वाढते अंतर, दारिद्र्याचे जागतिक व विशेषतः ‘तिसऱ्या जगा’तील प्रादेशिक स्वरूप, प्रगत व अप्रगत प्रदेशांमधील असमतोल असे प्रश्न या उपांगात हाताळले जात आहेत. मानवसमूहांच्या आर्थिक व सामाजिक समस्यांकडे विशेष लक्ष केंद्रित होत आहे. खेडी-शहरे यांत दिसून येणाऱ्या सामाजिक संस्था, रूढी इत्यादींचा उमटलेला प्रभाव, समाजातील विभिन्न सांस्कृतिक व धार्मिक घटक व त्यांच्या प्रक्रिया असे समाजाभिमुख प्रश्न ‘समाज भूगोला’ त अभ्यासले जात आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकीय संस्था, त्यांमधील एकोपा व मतभेद, राष्ट्रातील ऐक्य व प्रदेशिकता दृष्टिकोन, लोकराज्य व मतदारांची प्रतिक्रिया, असे प्रश्न ‘राजकीय भूगोला’त येतात. आहार, आरोग्य, रोगनिवारण अशा प्रश्नांच्या महत्त्वामुळे ‘वैद्यकीय भूगोल’ हे नवीन उपांग वाढत आहे. पूर, अवर्षण, भूकंप इ. नैसर्गिक आपत्तींचा मानवसमूहावर होणारा परिणाम आणि मानवकृत जल, वायू, ध्वनी यांतील प्रदूषणे व त्यांचे पर्यावरण व जनसंख्येवर होणारे दुष्पपरिणाम, अशा विशिष्ट समस्यांवर संशोधन केले जात आहे.

अलीकडे भाषा. कला (शिल्प, संगीत, नाट्य, नृत्य, अलंकार, वेशभूषा), आहारपद्धती, आचार-विचार, वन्य जमातींचे बदलत असलेले पर्यावरण अशांच्या प्रादेशिक अभ्यासास ‘सांस्कृतिक भूगोल-शास्त्र’ हे नाव प्राप्त झाले आहे. अमेरिकन भूगोलतज्ञ कार्ल ओ. साऊर यांनी या उपांगाचे महत्त्व पटवून दिले. मेइनिग व इतर तज्ञांनी साऊर यांच्या परंपरेत भर घातली असून या परंपरेत सोफर यांनी आपल्या संशोधनाद्वारे व श्वार्ट्‌सबर्ग यांनी ए हिस्टॉरिकल ॲटलास ऑफ साउथ एशिया या बहुमोल प्रकाशनाने भारताच्या सांस्कृतिक विविधतेच्या अभ्यासात भर घातलेली आहे. अशा सर्व समाजाभिमुख संशोधनकार्यात एक मुख्य हेतू आढळतो : मानवी प्रयत्नांनी मानवी जीवनात खरीखुरी मानवता कशी आणता येईल? आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने? शिक्षण, कौशल्य मिळवून? सामाजिक बंधने शिथिल करून? का राजकीय क्रांतीने समाज सत्ताराज्य आणून? तरूण पिढीतील काही भूगोलतज्ञांचा कल राजकीय क्रांतीकडे झुकत आहे.


एक नवे उपांग : अगदी अलीकडे मानव परिसर-पर्यावरणाविषयी व्यक्तीची वा समूहांची ‘ज्ञानग्रहणशक्ती’ (संवेदन) अजमाविण्यासाठी, तिचे मापन करण्याकडे काही तज्ञांचे लक्ष लागले आहे. उ. मुंबईतील झोपडपट्टीतील कामगारास ‘त्याची मुंबई’ म्हणजे त्याचे राहण्याचे ठिकाण, कामास जाण्याचा मार्ग, कामाचे ठिकाण एवढीच! कारण, तेवढाच मुंबईचा भाग तो पहातो व समजू शकतो, असे एका संशोधनात आढळून आलेले आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती – श्रीमंत वा गरीब – आपल्या ‘पाहिलेल्या व अनुभवलेल्या’ विश्वात वावरत असते. काही तज्ञ या आकलनास व्यक्तीचा ‘खासगी भूगोल’ (प्रायव्हेट जिऑग्रफी) असे म्हणतात. हा अभ्यासाचा दृष्टिकोन व हे मापन महत्त्वाचे ठरत आहे. या रीतीने आपले शेतकरी, मजूर, कामगार, दलित व वन्य जमाती बांधव यांचा अभ्यास झाला, तर त्यांच्या निकडीच्या गरजा कोणत्या? त्यांची प्रतवार कोणती? त्यांची कौशल्यग्रहणशक्ती कितपत आहे? नियोजित विकास योजना त्यांना कशा व कितपत अनुकूल वाटतात, हे जास्त कळण्यासारखे आहे. नियोजित विकास योजनांमध्ये असे अभ्यास उपयुक्त ठरतील. हे अलीकडे झालेल्या ठाणे जिल्ह्यातील वारली समाज आणि वाईजवळील धोम धरणग्रस्तांच्या अभ्यासावरून कळून येते. मानव भूगोलशास्त्रातील हे नवे दालन महत्त्वाचे उपांग ठरत आहे.

आंतरशास्त्रीय स्वरुप : भूगोलशास्त्राचे मूळ उद्दिष्ट सुसूत्रीकरण असल्याने संबंधित विविध शास्त्रांबरोबर देवाण-घेवाण होणे साहजिकच आहे. अर्थ, राज्य, इतिहास, मनुष्य, समाजशास्त्र इत्यादींशी मानव भूगोलशास्त्राचा निकट संबंध येतो. पण काही अभ्यासांत भूशास्त्र, हवामान, वनस्पती या शास्त्रांचा उपयोग महत्त्वाचा असतो. अशी मदत कशी घ्यावी, हे संशोधकाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. भूगोलशास्त्राचे वैशिष्ट्य हे आहे की, इतर तज्ञ आपल्या मौलिक संशोधनाने हे शास्त्र संपन्न करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी आपल्या भारतीय स्थलकोश या ग्रंथात लिहिलेली १०० पानी अत्यंत उपयुक्त प्रस्तावना.

संशोधन पद्धती : इतर भौतिक शास्त्रांप्रमाणे आधुनिक भूगोलशास्त्राचा रोख मूलतत्त्वे, तात्त्विक व अनुभवजन्य नियम, प्रतिमाने इत्यादींकडे झुकला आहे. या सर्वांत तर्कशास्त्र आधारभूत समजले जाते. संशोधन शुद्धतेसाठी संकल्पना, परिकल्पना, गृहीतकीय विधाने इ. स्पष्ट मांडून ती सिद्ध करण्यासाठी ‘सांख्यकीय’ पद्धती, संगणक, हवाई व उपग्रहांद्वारा पाठविण्यात येणारी चित्रे यांचा वापर बराच होतो. अशा सर्व संशोधनात ‘क्षेत्रीय (स्थलीय) विश्लेषण’ हा प्रधान हेतू असतो, याकरिता नकाशाशास्त्राचा उपयोग करणे अनिवार्य ठरते. कोणत्याही समस्येचे क्षेत्रीय स्वरूप नकाशाद्वारे ओळखणे व त्याचे विवेचन करणे हे साध्य होते.

या संदर्भात टॉर्स्टेन हॅगरस्ट्रँड या स्वीडिश तज्ञाने सांख्यिकीय पद्धतीची नवीन उपयुक्तता परिणामकारकरीत्या दाखविली आहे. कोणत्याही मानवी कल्पना, नवकल्पना, धोरण व प्रचार (उदा., जपानी भात शेती पद्धत, संततिनियमन) यांचा प्रसार संभाषण, वृत्तपत्रे, रेडिओ दूरचित्रवाणी यांद्वारे होतो. या प्रसारात प्रादेशिक स्वरूप आढळून येते. एखाद्या डबक्यात दगड टाकला की, पाण्यावर वर्तुळाकार तरंग पसरत जातात त्याप्रमाणे अशा प्रादेशिक प्रसरणाचा अभ्यास केला, तर इष्ट प्रसारात अडथळे कोणते व कोठे आणि ते कसे काढावेत, यांचे ज्ञान विकास योजना अंमलात आणण्यास विशेष उपयुक्त ठरते. असा अभ्यास आपल्या देशात सांसर्गिक रोग, वन्य जमातींच्या प्रदेशविकास योजना अशा अनेक समस्यांत व्हावयास हवा.


प्रगत व अप्रगत राष्ट्रांमधील काही ठळक भिन्न भिन्न प्रश्न : या दोन राष्ट्रगटांमधील प्रश्नांत बरीच भिन्नता आढळून येते. संपन्न राष्ट्रांत गरिबी नाही, पण बेकारीचा प्रश्न वारंवार उद्‍भवतो वयोवृद्धांची वाढती संख्या, वर्ण संघर्ष, यांत्रिक शेती व वन संहारामुळे झालेली निसर्गाची अनास्था, नागरीकरणामुळे वाढते प्रदूषण, विशाल नगरांचे नियोजन, निसर्ग संगोपन आणि संवर्धन व विशेषतः समतोल प्रादेशिक विकास, अशा संशोधनावर विशेष भर दिला जातो. याप्रमाणेच निसर्ग व मानवी जीवन यांमध्ये सुसंगती कशी आणावी, हे शालेय/विद्यापीठीय शिक्षणाचे ध्येय असते. याउलट अप्रगत राष्ट्रांत बेसुमार जनसंख्यावाढ व वाढते दारिद्र्य यांशी निगडित असलेल्या अनेक समस्या महत्त्वाच्या ठरतात. विशेषतः जनसंख्या निरोधन, नैसर्गिक आपत्तीचा परिणाम, अयोग्य व अपुरा आहार, रोगांचा प्रादुर्भाव, आरोग्य संवर्धन, नागरीभवनामुळे ओढवलेली सामाजिक संकटे, निसर्ग पर्यावरण संगोपन, हे विषय संशोधनात महत्त्वाचे व निकडीचे ठरतात.

भारतीय मानव भूगोलशास्त्र : या शास्त्रातील विचार, संशोधनविषय,पद्धती वअनुषंगाने शालेय/विद्यापीठीय शिक्षण यांवर अजूनही जुन्या कल्पनांचा व दृष्टिकोनाचा किती पगडा बसलेला आहे हे अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, प्रबंध व इतर प्रसिद्ध झालेले संशोधन यांवरून कळू शकते. केवळ पाश्चात्य विचार व कार्यपद्धती यांवर हे सर्व चालते, ही वस्तुस्थिती खेदजनक समजली पाहिजे. वास्तविक समस्या कोणत्या, कोणती कार्यपद्धती योजावी, भौगोलिक दृष्टिकोनाने त्यांचे कसे जास्त आकलन होईल व निष्कर्षानुसार कोणत्या उपाययोजना सुचविता येतील. असा अनुक्रम आपल्या संशोधनात हवा. अशी सुरुवात झाली आहे हे वर नमूद केलेल्या वारली जमात, वाई-घोम प्रकल्पग्रस्त, मुंबईतील कामगारांची ‘मुंबई’ या उदाहरणांव्यतिरिक्त, अहमदाबादेतील दाट वस्तीत राहणाऱ्यांचे परिसर आकलन, गंगेच्या खोऱ्यातील पूरग्रस्तांचे प्रश्न, मद्रास शहरातील गुन्हेगार प्रवृत्तींचे क्षेत्रीय स्वरूप, झोपडपट्ट्यांतील जीवन, दुष्काळपीडितांचे स्थलांतरण अशांच्या समस्याभिमुख अभ्यासांवरून कळून येईल.

भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय समस्या इतक्या आहेत, परंतु त्यांकडे लक्ष देण्यास अजूनही सुरुवात झाली नाही, असे म्हणावे लागेल. काही ठळक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत. महात्माजींच्या शिकवणुकीप्रमाणे आपला शेतकरी व आपली खेडी, उपलब्ध आधुनिक तंत्राचा जरूर तो उपयोग करून, कशी स्वावलंबी करता येतील? खेड्यांमधील जातिनीहाय राहणी व अलग हरिजन वस्ती ही सुधारून समाजात एकोपा कसा आणता येईल? शहरातील झोपडपट्टी जीवनास कसा आळा घालता येईल? काही शहरांत वारंवार होणारा धार्मिक संघर्ष कसा टाळता येईल? जनतेत निसर्ग संगोपन व संवर्धन यांविषयी आवड कशी निर्माण करता येईल? विकास योजना अंमलात आणताना तेथील वन्य जमातींचे कल्याण व प्रगती साधण्यास कोणते उपाय योजणे शक्य आहे? नैसर्गिक आपद्ग्रस्त समूहांना कशा प्रकारचे खरे साहाय्य करण्याचे मार्ग कोणते? पुन्हा उद्‍भवलेल्या मलेरिया साथीचे प्रादेशिक रूप कोणते, सांडपाण्याच्या दुरुवयोगाने ही साथ कितपत वाढत आहे व तीबाबत ग्रामीण जनतेस कोणत्या सुधारणा व उपाय सुचवावेत? कालव्याचे पाणी घेणारा संपन्न शेतकरी व कोरडवाहू धान्य काढणारा त्याचा चिंताग्रस्त शेजारी यांमधील आर्थिक व सामाजिक वाढता फरक कसा कमी करता येईल? भारतीय ऐक्य व प्रादेशिक आकांक्षा या दोन्ही कशा पूर्ण करावयाच्या? अशा अनेक समस्यांचा सखोल अभ्यास होणे जरूर आहे.

यासाठी मानव भूगोलशास्त्र हे ‘मानवाच्या कल्याणासाठी झटणारे शास्त्र व साधन ’आहे, या ध्येयाचा ठसा संशोधक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या मनात उमटला पाहिजे. हे मानव भूगोलाचे स्पष्ट आव्हान असून, ते स्वीकारणे भारतीय परंपरेला अनुसरून होईल.

देशपांडे, चं. धुं.