कामरूप: पूर्व भारतातील एक प्राचीन देश. हा हल्लीच्या आसाम राज्यात असून, सध्या आसाम राज्याचा एक जिल्हा कामरूप नावाने प्रसिद्ध आहे. शिवाने कामदेवाचे दहन केल्यावर त्याला त्याचे मूळ रूप पुन्हा याच प्रदेशात प्राप्त झाल्यामुळे याचे कामरूप असे नाव पडले अशी एक पौराणिक आख्यायिका आहे तर संथाळ लोकांच्या कामरूप या देवीच्या नावावरून कामरूप नाव पडले असे काही मानतात. प्राग्ज्योतिष असेही याचे आणखी एक नाव आहे. त्यावेळी या देशात मणिपूर, जैंतिया, काचार, पश्चिम आसाम, मैम‌नसिंग व सिल्हेट टेकड्यांचा काही भाग यांचा समावेश होत असे. येथील भगदत्त राजा भारतीय युद्धात कौरवांकडून लढला होता. तेराव्या शतकाच्या सुरुवातीला हा देश आहोम राजांनी जिंकला. येथील लोक प्रामाणिक, सरळ परंतु तापट स्वभावाचे असून, वर्णाने तांबूस व बांध्याने ठेंगणे होते. त्यांच्या स्त्रिया जादूटोण्यामध्ये अत्यंत प्रवीण होत्या.

जोशी, चंद्रहास