मेनाम चाऊफ्राया : थायलंड देशातील मुख्य नदी. लांबी सुमारे १,२०० कि.मी., आग्नेय आशियातील ब्रह्मदेश, चीन व लाओस यांच्या सीमाप्रदेशात पिंग, वांग, यांग, नान या मुख्य आणि इतर लहान नद्यांचा एकत्रित प्रवाह मेनाम चाऊफ्राया नदी म्हणून ओळखला जातो. या नदीचे वरचे खोरे विस्तृत, डोंगराळ व अरण्यमय आहे. त्याचा मध्यभाग पिंग आणि वांग या नद्यांच्या खोऱ्यांचा असून तो पूर्वभागा त काहीसा सपाट आहे. हा प्रदेश अरण्याचा असला तरी शेतीखालील जमिनीचा विस्तारही मोठा आहे. पिंग आणि यॉम या नद्यांच्या संगमानंतर मुख्य प्रवाहापासून अनेक वितरिका फुटतात व त्यामुळे मेनाम चाऊफ्रायाचा विस्तीर्ण त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे या वितरिका अनेक कालव्यांनी एकमेकींस जोडला असल्याने नदीच्या त्रिभुज प्रदेशांत प्रवाहांचे जाळे बनलेले आहे. पावसाळ्यातील पुरामुळे सर्व प्रवाह तुडुंब भरून त्यांचे पाणी या त्रिभुज प्रदेशांत दूरवर पसरते. ठिकठिकाणी दाट वनराजी आणि दलदलीचे खोलगट भागही आढळतात. तथापि, भातशेतीखालील क्षेत्र वाढत असून हा त्रिभूज प्रदेश थायलंडचे धान्य कोठार समजला जातो.

मेनाम चाऊफ्राया अनेक वितरिकांद्वारे सयामच्या आखातास मिळते. त्यांपैकी तेचीन व चाऊफ्राया या दोन मुख्य वितरिका होत. त्यांच्या मुखांपासून सुमारे ८० कि.मी. पर्यंत वरच्या भागात नौकानयन होऊ शकते. वितरिका आणि कालवे यामधून लहान नौका, होड्या जाऊ शकतात दळणवळण व व्यापाराकरिता त्रिभुज प्रदेशातील या प्रवाहाचे जाळे उपयुक्त ठरले आहे. वितरिकांत व समुद्र किनाऱ्यावर मासेमारी काही प्रमाणात चालते.

थायलंडची राजधानी व मुख्य शहर बँकॉक हे चाऊफ्रायाच्या मुखाशी वसलेले आहे. ते सागरी मार्गांवरील आग्नेय आशियामधील प्रमुख बंदर असून आता आंतरराष्ट्रीय विमान मार्गांवरील महत्त्वाचे ठिकाण झाले आहे.

सांस्कृतिक दृष्ट्याही मेनाम चाऊफ्राया खोऱ्यांचे महत्त्व आहे सुखोथाई ही जुनी थायलंडची राजधानी खोऱ्याच्या मध्यभागी वसलेली आहे. ‘अयुधिया’ (अयोध्या) ही १३५० ते १६५० या काळातील राजधानी बँकॉकच्या उत्तरेस चाऊफ्राया नदीच्या काठी वसलेली आहे.

पूर्वी ‘मेनाम’ या नावाने ही नदी ओळखली जात असे. पण आता चाऊफ्राया या विशेष महत्त्वाच्या वितरिकेवरून ‘मेनाम चाऊफ्राया’ हे नाव जास्त रूढ झाले आहे.

देशपांडे चं. धुं.