खोतान : चिनी होत्येन. चीनच्या सिंक्यांग ऊईगुर स्वायत्त विभागाच्या नैर्ऋत्य भागातील मरूद्यान व शहर. लोकसंख्या ५०,००० (१९५८ अंदाज). हे खोतान नदीच्या मुख्य फाट्यावर, कुनलुन पर्वताच्या पायथ्याशी, प्राचीन रेशीम रस्त्यावर, ताक्लामाकान मरुभूमीच्या दक्षिणेस, यार्कंदपासून २५७ किमी. आहे. मरूद्यानात खोतानच्या पाण्यावर मका, गहू, तांदूळ, ओट व इतर भरड धान्ये होतात. कापसाचे पीकही महत्त्वाचे आहे. ल्यूसर्न गवत, ऑलिव्ह, जर्दाळू, पीच, सफरचंद यांचेही पीक येते आणि तुतीच्या पानांवर रेशमाचे किडे पोसतात. सुती आणि रेशमी कापड, कागद, कातडीवस्तू, सतरंज्या, गालिचे, फेल्ट, धातुकाम यांचे कारखाने शहरात आहेत. नद्यांच्या गाळात सोन्याचे कण सापडतात व जवळपास जेडच्या खाणी आहेत जेड व सोने यांपासून बनविलेल्या वस्तूंसाठी खोतान पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. हल्ली यार्कंद, कॅश्गार, उरूमची येथे जाणारा मोटारी हमरस्ता खोतानवरून जातो. मध्य आशिया व भारत यांमधील, हा प्राचीन दुवा असल्यामुळे खोतानमार्गेच भारतातून बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार झाला. पहिल्या शतकापासून येथे चिनी सत्ता होती. आठव्या शतकात अरबांनी खोतान जिंकले व येथील व्यापार वाढला. तेराव्या शतकात चंगीझखानाने ते घेतले, तेव्हा ते खालावले. १२७५ च्या सुमारास मार्को पोलो येथे झाला होता. त्याच्या लक्षात याचे व्यापारी महत्त्व आले होते. अनेक राजकीय स्थित्यंतरांनंतर १८७८ पासून येथे चीनची सत्ता आहे.

ओक, द. ह.