जेनोआ: वायव्य इटलीतील जेनोआ प्रांताची राजधानी. लोकसंख्या ८,१२,४९१ (१९७१). हे इटलीचे पाचव्या क्रमांकाचे शहर व प्रमुख बंदर जेनोआच्या आखाताच्या टोकाशी, मिलानच्या दक्षिणेस १२९ किमी. आहे. भूमध्य समुद्रावरील महत्त्वाचे बंदर आणि मध्य यूरोपातून दक्षिणेकडे होणाऱ्या निर्यातीचे प्रमुख बंदर असल्याने इटलीतील प्रमुख जहाज कंपन्यांची कार्यालये येथेच आहेत. ऑलिव्ह तेल, मद्ये, रेशीम, मखमल, फुले, साबण, मोटारी यांची निर्यात व कोळसा, कोक, खनिज तेले, रसायने, यंत्रे यांची आयात जेनोआ बंदरातून होते. इटलीचा जहाजबांधणी व्यवसाय तर येथे केंद्रित झाला आहेच पण त्याशिवाय पोलाद, मोटारीचे सांगाडे, विमान एंजिने, साखर, गंधक, ऑलिव्ह तेल शुद्धीकरण, कातडी कमावणे, रसायने, दारूगोळा, प्रशीतक, खते, कागद, कापड, साबण इ. विविध प्रकारच्या कारखान्यांमुळे जेनोआची गणना यूरोपातील महत्त्वाच्या औद्योगिक शहरांत होते. या प्रसिद्ध प्राचीन शहरातील सॅन लॉरॅन्झो कॅथीड्रल, सॅन डोनॅटो, सेंट आम्ब्रोजिओ, अनन्सिएशन आदी प्रार्थना मंदिरे, डोजेस राजवाडा, बियांको वाडा, कार्लेफेलिस रंगमंदिर वगैरे वास्तू प्रसिद्ध आहेत. येथील सोळाव्या शतकातील नगरभवनातील संग्रहालयात पेगॅनिनीचे व्हायोलीन, कोलंबसची पत्रे ही प्रमुख आकर्षणे आहेत. व्यापार व नौकानयनशास्त्राची महाविद्यालये तसेच कला अकादमी, विद्यापीठ या संस्थांमुळे जेनोआ इटलीतील महत्त्वाचे शिक्षणकेंद्र झाले आहे.

प्राचीन काळी लिग्युरियनांचे हे मुख्य बंदर इ.स.पू. तिसऱ्या शतकात रोमनांच्या ताब्यात गेले. रोमनांनंतर लाँबर्डी लोक व सार्सानिक तुर्कांनी येथे राज्य केले. मध्ययुगात येथील प्रजासत्ताकाची गणना इटलीतील प्रमुख राज्यांत होती. व्हेनिस बरोबरच्या स्पर्धेत या प्रजासत्ताकाचा अस्त झाला. अठराव्या शतकाच्या अखेरीस फ्रान्सच्या साम्राज्यात असलेले हे शहर १८१५ मध्ये सार्डिनियाच्या राज्यात विलीन झाले. दुसऱ्या महायुद्धातील आरमार व हवाई हल्ल्यांमुळे शहरातील अनेक प्राचीन इमारतींची पडझड होऊन बंदराचे व व्यापारी पेठांचेही पुष्कळ नुकसान झाले. कोलंबस, पेगॅनिनी, मॅझिनी वगैरे महान इटालियन जेनोआचे नागरिक होते. येथील तुरुंगवासात मार्को पोलोने आपला प्रसिद्ध प्रवासवृत्तान्त लिहिला.

                       ओक, द. ह.