गौर : पश्चिम बंगालमधील प्राचीन अवशेषांचे एक पुरातन नगर. गौड या नावानेही ते प्रसिद्ध आहे. प. बंगालच्या माल्डा जिल्ह्यात इंग्लिश बझार या गावाच्या दक्षिणेस सु. ८ किमी.वर गंगा नदीच्या जुन्या कालव्यावर पूर्व काठी ते वसले आहे. त्याच्या नावाविषयी व स्थापनेविषयी तज्ञांत एकवाक्यता आढळत नाही. गौर अथवा गौड हा गूळ या शब्दाचा तत्भव असावा, असे प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ अलेक्झांडर कनिंगहॅम आर्किऑलॉजिकल रिपोर्ट ऑफ इंडीयामध्ये म्हणतो. कारण गौर ही पूर्वी गुळाची मोठी बाजारपेठ होती तर काही तज्ञ गौरिया बंगाला या साम्राज्य नावाशी त्याचा संबंध लावतात. सेन वंशाने आपली राजधानी अकराव्या शतकापूर्वी येथे स्थापन केली होती. स्थानिक परंपरेनुसार बल्लाळ व लक्ष्मणसेन या सेन राजांनी येथे अनेक वास्तू बांधल्या. त्यामुळे गौरचा मध्ययुगात लक्ष्मणवती वा लख्नौती या नावाने उल्लेख करीत. ११९८ पासून पुढील सु. तीनशे वर्षे दिल्लीच्या मुसलमान सुलतानांचा अंमल त्यावर होता. तेव्हापासूनचा लिखित इतिहास उपलब्ध आहे. या काळात ते मुसलमान संस्कृतीचे पूर्वेकडील एक प्रमुख केंद्र होते. त्याचा उल्लेख मुसलमान लोक जन्नताबाद, फतेहाबाद, हुसेनाबाद किंवा नस्रताबाद असा विविध प्रकारे करीत. सोळाव्या शतकात अफगाण लोकांनी गौर काबीज केले. १९७५ मध्ये गौरला प्लेगचा तडाखा बसला व नगर ओसाड झाले.
एके काळी हे नगर अत्यंत समृद्ध होते. त्या वेळी त्याचे क्षेत्रफळ ३४ चौ.किमी. असावे. येथील अवशिष्ट वास्तूंत दोन भिन्न संस्कृतींची छाप स्पष्ट दिसते. सेन वंशाच्या कारकीर्दीतील वास्तूंचे फार थोडे अवशेष आज आढळतात. या वास्तूंचे वैशिष्ट्य म्हणजे निमुळते पण घुमटाकार शिखर आणि विटांचे ठेंगणे स्तंभ होत. मुस्लिम सत्तेखाली निमुळत्या टोकदार कमानींनी यांत भर घातली पण भारतातील इतर प्रदेशांत हिंदू व मुसलमान शैलीची जशी एकरूप सरमिसळ झाली, तशी येथे झालेली दिसत नाही. येथील उठावाच्या नक्षीकामातील ओबडधोबडपणा आणि विसंवादी छप्पर यांमुळे वास्तू कलात्मक दृष्ट्या गौण वाटतात. अनेक मशिदींपैकी सुवर्ण मशीद (१५२६) आणि बालेकिल्ल्यातील दाखिल दरवाजा (१४६०–७४) एवढेच विटांचे व मातीकामाचे नमुने उल्लेखनीय आहेत. बाकीच्या वास्तुरचनेत तंतिपुरा व लोतन (१४७५–८०) या मशिदींत वीटकामाचे काही चांगले बांधकाम आढळले, तरी रचनेचा एकच प्रकार दिसतो. दाखिल दरवाज्यास मुसलमान समाजात एक विशिष्ट महत्त्व आहे. मुहंमद पैगंबराच्या पायाचा ठसा उमटलेल्या जागी तो बांधला आहे, असे तो समाज मानतो. बालेकिल्ल्यात कदम रसूल (१५३०) नावाची एक मशीद आहे. या वास्तूंच्या अवशेषांव्यतिरिक्त नंतर गौर येथे इतर मानवी वस्ती फारशी झालेली दिसत नाही.
संदर्भ : 1. Ravenshaw, G. H. Gaur, Its Ruins and Inscriptions, 1878.
2. Sarkar, Jadunath, History of Bengal, Patna, 1973.
देशपांडे, सु. र.