कुक शिखर : आओरांगी. न्यूझीलंडमधील सर्वोच्च शिखर. उंची ३,७६४ मी. हे न्यूझीलंडमधील दक्षिणेकडील बेटाच्या पश्चिममध्यभागावरील सदर्न आल्प्स पर्वतावर आहे. ब्रिटिश समन्वेषक कॅप्टन कुक याने १७६९ साली आपल्या समन्वेषणात या शिखराची उंची बोटीवरून मोजली होती. त्याच्याच स्मरणार्थ या शिखराला कुक शिखर नाव मिळाले. आओरांगी म्हणजे माओरी भाषेत शुभ्र ढग. कुक शिखर सदैव हिमाच्छादित असल्याने त्यालाही स्थानिक लोक आओरांगी म्हणतात.१८९४ साली न्यूझीलंडच्या फाइफ, ग्रॅहॅम व क्लार्क ह्यांनी कुकवर यशस्वी चढाई केली. कोणत्याही दिशेने या शिखराची शोभा अवर्णनीय दिसते. म्हणूनच गिर्यारोहकांचे हे आवडते स्थळ बनले आहे.

शाह, र. रू.