कोलार : कर्नाटक राज्याच्या कोलार जिल्ह्याचे प्रमुख ठाणे. लोकसंख्या ४३,३४५ (१९७१). हे मद्रासच्या पश्चिमेस सु. २२५ किमी. वर असून बंगलोरच्या आग्नेयीस ६९ किमी. तसेच कोलार गोल्ड फील्डपासून (रॉबर्टसनपेटपासून) उत्तरेस सु. ३४ किमी. वर वसलेले आहे. दक्षिण लोहमार्गावरील हे एक प्रमुख स्थानक असून बंगलोर–मद्रास या राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे दळणवळणाचे प्रमुख केंद्र बनले आहे. एक औद्योगिक शहर म्हणून याची प्रसिद्धी असून रेशमी कापड, घोंगड्या, साबण, पेन्सिली वगैरे व्यवसाय येथे चालतात. अनेक ऐतिहासिक घडामोडींचे हे ठिकाण असल्याने येथे प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तू पहावयास मिळतात. त्यांपैकी कोल्लारम्माचे देऊळ, जुना किल्ला आणि हैदरच्या वडिलांची कबर प्रेक्षणीय आहे.

कापडी, सुलभा.