उर्मिया सरोवर : वायव्य इराणच्या आझरबैजान भागामधील भूवेष्टित सरोवर. सरोवराच्या पश्चिमेकडील उर्मिया अथवा रेझाई या गावावरून सरोवरास हे नाव पडले. सरोवरास पूर्वेकडून टालखे व दक्षणेकडून झारीने या नद्या मिळतात. सरोवर दक्षिणोत्तर सु. १२९–१४२ किमी. व पूर्वपश्चिम सु. ३७–५८ किमी. असून ४,००० ते ६,००० चौ. किमी. क्षेत्रफळ ह्याने व्यापलेले आहे. ह्याची सरासरी खोली पाच मी. असून क्षारता मृतसमुद्राच्या तीन पंचमांश आहे साहजिकच येथे प्राणिजीवन नाही. सरोवरामध्ये २,१८९ मी. लांबीचा एक वाळूचा दांडा बनलेला असून दक्षिण किनाऱ्याजवळ सु. पन्नास ओसाड बेटे आहेत. सरोवराच्या ईशान्येकडे शरीफखाने हे बंदर असून रेल्वेमार्गाने ते ताब्रीझशी जोडलेले आहे. सरोवरामधील नौकानयनाचा आनंद उपभोगण्याकरिता हौशी प्रवासी येथे येतात.

शाह, र. रू.