सहारनपूर : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक औदयोगिक शहर व याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ४,५२,९२५ (२००१). हे शिवालिक पर्वतश्रेणीच्या पायथ्याशी, दिल्लीच्या उत्तरेला सु. १६५ किमी. व डेहराडूनच्या नैऋर्त्येस सु. ५२ किमी.वर वसले आहे. राष्ट्रीय महामार्ग क. ७३ व हावडा-अंबाला लोहमार्ग यांवरील हे प्रमुख स्थानक असून ते धान्य, लाकूड व कापड यांच्या घाऊक व किरकोळ व्यापाराचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
सहारनपूर जिल्ह्याच्या क्षेत्राचा इतिहास इ. स. पू. सहाव्या शतकापासूनचा ज्ञात आहे. कुलिंद देश तो हाच प्रदेश असावा असे तज्ज्ञांचे मत आहे. सहारनपूर शहराची स्थापना दिल्ली सल्तनतीच्या काळात मुहंमद तुघलकाच्या आज्ञेवरून १३४०मध्ये झाल्याचे उल्लेख मिळतात. त्याने या गावाला मुस्लिम संत शाह हस्न चिश्ती यांच्या स्मरणार्थ शाह-हरनपूर हे नाव दिले. आजही शहराच्या जुन्या भागात त्यांचे स्मारक असून ते मुसलमानांचे पवित्र ठिकाण आहे. पूर्वी हे छोटे गाव लष्करी कँटोनमेंट होते. अकबराच्या कारकीर्दीत दिल्ली प्रांताचा एक भाग म्हणून ‘ सहारनपूर सरकार ’चे ते प्रशासकीय केंद्र करण्यात आले व तेथे गव्हर्नरची नेमणूक करण्यात आली. तत्कालीन येथील टांकसाळीमुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर स्थानिक प्रशासकांनी त्यावर अधिसत्ता गाजविली. त्यांपैकी बहिसय्यद (१७१२) याची कारकीर्द विशेष गाजली. पुढे रोहिल्यांनी सय्यदांना १७४८ मध्ये येथून हुसकावून लावले. त्यानंतर शीख व मराठयांनी या प्रदेशावर स्वाऱ्या केल्या. त्यांपैकी राजा साह रणवीर सिंगाने सांप्रतच्या शहराचा विकास केल्याचे सांगितले जाते. त्याने शहराभोवती भिंत बांधली होती. त्याच्या किल्ल्याचे अवशेष येथे आढळतात. १७९० मध्ये महादजी शिंदे यांच्या अंमलाखाली हे शहर होते. त्यानंतर १८०३ मध्ये तहानुसार हे ब्रिटिशांच्या ताब्यात गेले व पुढे स्वतंत्र भारताच्या उत्तर प्रदेश राज्यात समाविष्ट झाले.
सहारनपूर मध्ये १८६७ साली नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. सांप्रत महानगरपालिकेमार्फत शहराचा कारभार पाहिला जातो. शहरात महाविदयालयीन शिक्षणापर्यंतच्या तांत्रिक शिक्षणाच्याही सर्व सुविधा उपलब्ध आहेत. येथील काष्ठकोरीव कामाचा कुटिरोदयोग पूर्वापार प्रसिद्ध असून सु. निम्मी लोकसंख्या या व याच्याशी निगडित उदयोगांत गुंतलेली असते. यांशिवाय कापड, तयार कपडे, साखर, गूळ, सिगारेटी इ. निर्मिती उदयोग शहर व परिसरात विस्तारलेले आहेत. १९६० हेक्टर क्षेत्रात अश्वपैदास केंद्र आहे.
सहारनपूरमधील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी काळातील ‘ कंपनी गार्डन ’, १७५० पूर्वीचे सहारनपूर वनस्पती उदयान, आंबेडकर उदयान काष्ठशिल्पांच्या व अन्य बाजारपेठा पार्श्वनाथ, पाताळेश्वर, भुतेश्वर, बाघेश्वर, लक्ष्मीनारायण, साईबाबा धाम इ. मंदिरे तसेच जामा व अन्य मशिदी, मदरसा, तीस धारा पूल, लाला दास वाडा इ. ऐतिहासिक व प्रेक्षणीय ठिकाणे पर्यटकांची आकर्षणे आहेत.
चौंडे, मा. ल.