जोकोत्येन : चीनच्या होपे (हबे) प्रांतातील अश्मयुगीन वसतिस्थान. हे पीकिंगच्या नैर्ऋत्येस सु. ६० किमी. वर आहे. येथे प्राचीन ज्ञात अशा सर्व पुराणाश्मकालीन गुहा सापडल्या असून १९२९ सालच्या उत्खननात नामशेष ‘पीकिंग मानवा’चे दात, हाडे, जबडे, कवट्या इ. अवशेष सापडले आहेत. त्यामुळे चीनमधील अश्मयुगीन पुरावा अधिक स्पष्ट झाला. सापडलेल्या अवशेषांवरून जोकोत्येन हे प्लाइस्टोसीन काळातील असून पुरांमुळे ते आपोआप उघडे पडले असे दिसते. सध्या याच्या आसमंतात कोळशाच्या खाणी असून तेथे लोहमार्ग गेलेला आहे.        

  कांबळे, य. रा.