पांपूर : जम्मू व काश्मीर राज्याच्या अनंतनाग जिल्ह्यातील केशराच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. लोकसंख्या ८,५८२ (१९७१) पूर्वी ‘पद्मपूर’ नावाने ओळखले जाणारे हे गाव श्रीनगरच्या आग्नेयीस १३ किमी. राष्ट्रीय हमरस्त्यावर झेलम नदीच्या खोऱ्यात वसले आहे. येथे नवव्या शतकातील देवालयांचे अवशेष व ख्वाजा साहिब दर्गा आहे. येथील घरे दुमजली व एकमेकांना लागून आहेत. उन्हाळ्यात वरच्या व हिवाळ्यात खालच्या मजल्याचा राहण्यासाठी वापर करण्यात येतो. पांपूरच्या आसमंतात केशराशिवाय गहू, तेल बिया, तांदूळ इ. पिके घेतली जातात. हातमागावर लोकरीचे कापड विणण्याचाही व्यवसाय चालतो.

दातार, नीला