डेमॉइन : अमेरिकेच्या आयोवा राज्याची राजधानी. लोकसंख्या उपनगरांसह २,५५,८२४ (१९७०). हे डे मॉइन व रॅकून नद्यांच्या संगमावर शिकागोच्या पश्चिमेस ४८० किमी. वसले आहे. दळणवळण, व्यापार व उद्योगधंदे यांचे हे मोठे केंद्र आहे. हे अमेरिकेच्या मका पिकविणाऱ्या पट्ट्याच्या अगदी मध्यावर असून त्याच्या आसपास कोळशाच्या खाणीही आहेत. कृषी अवजारे, रबरी धावा, विमानाचे सुटे भाग सिमेंट, कौले, विटा, दुग्धपदार्थ, मांससंवेष्टन, चामड्याच्या वस्तू वगैरेंचे कारखाने व उद्योग येथे असून विमाव्यावसाय, घाऊक व किरकोळ विक्री, निर्मितिउद्योग, प्रकाशन, शासकीय कारभार इत्यादींचे हे केंद्र आहे. देशातील एक प्रमुख नाट्यगृह आणि राज्याची जत्रा भरण्याची जागाही शहरात आहेत. येथे ड्रेक विश्वविद्यालय, अस्थिदोष चिकित्सा आणि शल्यशालाक्य तंत्रमहाविद्यालय, ग्रँड व्ह्यू पदवीपूर्व महाविद्यालय इ. शिक्षणसंस्था आहेत.                          

                              

लिमये, दि. ह.