माहूर (माहोर) : पूर्वीचे मातापूर. नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. हे किनवटच्या वायव्येस ४५ किमी. वर असून रेणुकादेवी (एकवीरा) चे मंदिर व दत्तात्रेयाचे वसतिस्थान यांसाठी प्रसिद्ध आहे. देवीच्या साडेतीन पीठांपैकी हे एक मूळ पीठ मानले जाते.

माहूर हे मराठवाडा व विदर्भ यांच्या सीमेवर, डोंगराळ भागात सस.पासुन सु. ७५५ मी. उंचीवर आहे. काही जुन्या अवशेषांवरून येथे पूर्वी मोठे नगर असावे असे दिसून येते. परशुराम आणि रेणुकामाता यांच्या अनेक प्रचलित कथा (रेणुकेचे वसतिस्थान, दहनस्थान इ.) या ठिकाणाशी निगडित आहेत. पुरातन अवशेषांपैकी येथील तटबंदीयुक्त माहूरगड प्रसिद्ध आहे. हा किल्ला तीन बाजूंनी पैनगंगा नदीने वेढलेला आहे.

माहूर गावाजवळच एका उंच टेकडीवर रेणुकामातेचे मंदिर असून ते देवगिरीच्या यादवांनी बांधले. मंदिरात देवीच्या मूर्तीऐवजी तांदळा (निरावयवी पाषाणाचा देव) आहे व त्यालाच देवीच्या मुखाचा आकार देण्यात आला आहे. त्यावर चांदीचा टोप असून बैठकीवर सिंहाचे चित्र कोरलेले आहे.येथील मूळची रेणुकेची मूर्ती उत्तानपाद, शिरोहीन होती असे अभ्यासकांचे मत आहे.रेणुकेच्या मंदिराजवळच कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी, परशुराम यांची लहान मंदिरे आहे. दसऱ्याला येथे मोठी यात्रा भरते. येथून पूर्वेस सु. ३ किमी. अंतरावर दुसऱ्या एका टेकडीवर दत्तमंदिर असून ही टेकडी दत्तशिखर या नावाने ओळखली जाते. मंदिरात दत्तात्रेयाची एकमुखी मूर्ती असून या मंदिराला बादशहा औरंगजेबाने ४० हजारांची जहागिरी दिली होती असे म्हणतात. येथून जवळच अनसूयेचे मंदिर, अत्री ऋषीच्या पादुका, सर्वतीर्थ नावाचे कुंड, संत विष्णुदासांचा मठ, मातृतीर्थ (मावळा तलाव) इ. दत्त व माता रेणुकेच्या कथांशी निगडित अनेक पवित्र ठिकाणे आहेत. चक्रधरस्वामीचे (महानुभाव पंथाचे मूळ पुरुष) गुरू चांगदेव राऊळ यांनी माहूर येथेच दत्तात्रेयापासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला, अशी भाविकांची समजूत असल्याने महानुभाव पंथीयांच्या दृष्टीने हे ठिकाण महत्त्वाचे बनले आहे. दत्त जंयतीला येथे मोठी यात्रा भरते.

चौंडे, मा. ल.