जटलंड : उत्तर यूरोपातील द्वीपकल्प. याच्या उत्तरेस स्कॅगरॅक समुद्र, पश्चिमेस उत्तर समुद्र. पूर्वेस कॅटेगॅट समुद्र व दक्षिणेस आयडर नदी असून याचे क्षेत्रफळ ४३,६८५ चौ. किमी. आहे. यापैकी उत्तरेकडील २९,५५१ चौ. किमी. क्षेत्र डेन्मार्कमध्ये समाविष्ट असून दक्षिण भाग पश्चिम जर्मनीत आहे. कर्सनीसस सिंब्रिका हे याचे प्राचीन लॅटिन नाव. याच्या पश्चिम किनाऱ्यालगतचा भूभाग नापीक असून एस्ब्येर एवढे एकच बंदर यावर आहे. पूर्व किनारी भाग सुपीक व दाट लोकवस्तीचा आहे. ऑर्हूस, ऑल्‌बॉर, फ्रेडरिक्सहाउन ही पूर्व किनाऱ्यावरील प्रसिद्ध बंदरे आहेत. ३१ मे १९१६ रोजी जटलंडजवळ झालेल्या जर्मनी आणि इंग्‍लंड यांच्यातील आरमारी लढाईची गणना पहिल्या महायुद्धातील महत्त्वाच्या संग्रामात होते.

ओक, द. ह.