सागर : मध्य प्रदेश राज्यातील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय ठिकाण. तसेच याच नावाच्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे मुख्यालय. लोकसंख्या २,७३,३५७ (२०११). विंध्य पर्वताच्या एका निसर्गरम्य सोंडेवर एका सरोवराकाठी सागर वसले आहे. विंध्यची ही सोंड तिन्ही बाजूंनी सरोवराने वेढलेली आहे. भोपाळच्या ईशान्येस सु. २१४ किमी. वर, तर बांद्याच्या दक्षिणेस ४३ किमी. वर हे वसले आहे. मध्य रेल्वेचा बिना – कटनी लोहमार्ग येथूनच जातो. उदनशाह (उदनसिंग) या निहरशाहच्या वंशजाने सागर सरोवराजवळ इ. स. १६६० मध्ये किल्ला बांधून तेथे परकोटानामक खेडे वसविले. सांप्रत हे खेडे सागर नगरीचा एक भाग आहे. सागर येथे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्खनन करण्यात आले. त्यात ताम्रपाषाण युगात येथे मानवी वस्ती असल्याचे पुरावे मिळाले आहेत. याशिवाय येथे काही गुप्तकालीन नाणी व कोरीव लेख उपलब्ध झाले आहेत. सागरच्या नावाबाबत मतमतांतरे आढळतात. एका मोठ्या सरोवराभोवती हे वसले असल्याने या ठिकाणाला सागर हे नाव दिले असावे. दुसऱ्या एका मतानुसार सौगर हे मूळ नाव सौ (शंभर) व गड यांवरून आलेले असावे. कारण याच्या परिसरात लहान-लहान सु. शंभर किल्ले आढळतात. काळाच्या ओघात सौगरचे सागर झाले असावे. सरोवरांचे शहर म्हणूनही याचा उल्लेख केला जातो. टॉलेमीने उल्लेखिलेले ‘आगर’ (सागर) हेच असावे, असा तज्ज्ञांचा कयास आहे.

अठराव्या शतकात कुरवईच्या नबाबाने सागरवर आधिपत्य मिळविले. पहिल्या बाजीरावाने (कार. १७२०–४०) माळवा जिंकल्यानंतर तिथे गोविंदराव पंडित यास सुभेदार म्हणून नेमले. त्याने नबाबाकडून सागर हस्तगत करून जुन्या पडित किल्ल्याच्या ठिकाणी वीस भक्कम बुरुजांचा आणि ३६६ × १३७ मी. लांबी-रुंदीचा आयताकार किल्ला बांधला तसेच त्याच्या परिसरात इमारती आणि मंदिरे बांधून गाव सुशोभित केले. मराठ्यांच्या अमदानीत माळव्याच्या प्रशासनाचे हे प्रमुख केंद्र होते. पेंढाऱ्यांचा नेता अमीरखान याने ते दोनदा लुटले. शिंद्यांनी इ. स. १८१४ मध्ये त्यावर आक्रमण करून लुटले व तेथील सुभेदारास कैद केले आणि त्याच्याकडून पाऊण लाखाची जबर खंडणी घेऊन त्यास मुक्त केले. पेशवाईच्या अस्तानंतर (१८१८) ईस्ट इंडिया कंपनीने त्याचा ताबा घेऊन (१८२०) तेथे गव्हर्नर जनरलचा प्रतिनिधी ठेवला आणि लष्करी छावणीची (कँटोनमेंट) स्थापना केली. अठराशे सत्तावनच्या उठावात बंडवाल्यांनी सागर शहरावर हल्ला करताच ब्रिटिशांनी किल्ल्यात आश्रय घेतला. उठावानंतर ते पूर्णतः ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. सागरची नगरपालिका १८६७ मध्ये अस्तित्वात आली.

सागरच्या परिसरात शेती व पशुपालन हे प्रमुख व्यवसाय असून ते कृषिमालाच्या व्यापाराचे केंद्र आहे. शहरात हातमागावरील सुती कापडनिर्मिती, पितळकाम, तेल व पीठगिरण्या, लाकूड चिरकाम, लोणीनिर्मिती, सोन्या-चांदीचे दागिने बनविणे, रेल्वे व अभियांत्रिकी कर्मशाळा इ. उद्योग-व्यवसाय चालतात. यांशिवाय परंपरागत विड्या वळण्याचा व्यवसाय चालतो. रस्ते व लोहमार्गांनी हे महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडले आहे.

सागर नगराला सांस्कृतिक वारसा लाभला असल्याने ते पर्यटकांचे प्रमुख आकर्षक ठिकाण बनले आहे. येथे मध्ययुगीन किल्ला , मराठा वास्तुशैलीतील राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण, गंगा, चित्रगुप्त, वृंदावनबाग वगैरे प्रेक्षणीय मंदिरे असून यांपैकी वृंदावनबाग मंदिर झांशीची राणी लक्ष्मीबाई यांनी १८५१ मध्ये बांधले आहे. जुन्या मराठा किल्ल्यात पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. शहरात उंच व भव्य मिनार असलेल्या दोन मशिदी कात्रा व सातिचारी भागांत असून कँटोनमेंट भागात गॉथिक शैलीतील चर्च आहे. येथील सरोवराच्या काठावर अनेक घाट बांधलेले असून त्यांपैकी चक्रघाट भव्य व प्रेक्षणीय आहे. शहराजवळील रहाडगड धबधबा उल्लेखनीय आहे. शैक्षणिक दृष्ट्याही सागर महत्त्वाचे आहे. येथील सागर विद्यापीठ (स्था.१९४६) हे मध्य प्रदेशातील पहिले विद्यापीठ आहे. याशिवाय शहरात कला, वाणिज्य, विज्ञान अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालये, अश्वारोहण कला विद्यालय, औद्योगिक व वैमानिकी प्रशिक्षण संस्था तसेच विविध विषयांसाठी विशेष विद्यालये इ. प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत. हिंदी साहित्यातील उल्लेखनीय लेखक, कवी तसेच कलाकार येथे होऊन गेले आहेत.

देशपांडे, सु. र.