ताम्रलिप्ति : प्राचीन भारतातील एक भरभराटलेले बंदर व शहर, पश्चिम बंगाल राज्याच्या मिदनापूर जिल्ह्यातील रूपनारायण नदीकाठचे, रूपनारायण–गंगा संगमापासून १९ किमी. वरील हल्लीचे २२,७२० (१९७१) लोकवस्तीचे तामलूक म्हणजेच प्राचीन ताम्रलिप्ती, ताम्रलिप्ता, पालीतील तामलित्ती, तामलिटीस (टॉलेमी), पुराणातील ताम्रध्वजाची राजधानी दमलिप्ती व सहाव्या शतकातील प्राचीन सुह्य राज्याची राजधानी होय, असे मानले जाते. हे ठिकाण प्राचीन काळी गंगेच्या मुखाजवळ समुद्रकाठी होते परंतु गंगेच्या त्रिभुज प्रदेशाच्या वाढीमुळे ते आता सु. ९६ किमी. अंतर्भागात आले आहे. इ. स. पू. पाचव्या शतकात ते बौद्ध धर्माचे महत्त्वाचे केंद्र होते. तेथील एका विहाराच्या जागी आजही ब्रम्हपुराणात उल्लेखिलेल्या वर्गभीमा देवीचे मंदिर आहे. चिनी यात्रेकरू फाहियान (३९९–४१४) येथे आला होता. तो येथूनच श्रीलंकेला गेला. ह्युएनत्संग (६२९–६४५) याने याचे नीळ, रेशीम व तांबे निर्यात करणारे विख्यात बंदर असे वर्णन केले आहे तर इत्सिंग (६७३–९३) यानेही या नगरीस भेट दिली होती. येथे दहा बौद्ध मठ, एक हजार भिक्षू व सु. ६१ मी. उंचीचा अशोक स्तंभ होता असे तो म्हणतो. येथून आग्नेय आशियाशी मोठा व्यापार चालत असे. येथूनच इ. स. पू. पाचव्या शतकाच्या सुमारास श्रीविजयाची लंका वसाहतीची मोहीम आणि नंतर अडीचशे वर्षांनी अशोकाने बौद्ध धर्मप्रसारार्थ पाठविलेले बौद्ध भिक्षू निघाले असे मानतात. महाभारता व रघुवंशातही या नगराचा उल्लेख आहे. कथासरित्सागरात हे चौथ्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत एक प्रसिद्ध व्यापारी सागरी बंदर होते, असे वर्णन आहे. दंडीने आपल्या दशकुमारचरितात येथे बिंदूवासिनीचे मंदिर असल्याचे म्हटले आहे. हे एक शक्तिपीठही आहे. येथील उत्खननात चांदीचे व तांब्याचे शिक्के व मातीची भांडी सापडली आहेत. येथील १९५४-५५ मधील उत्खननात अश्मयुगापासून ते ऐतिहासिक काळापर्यंतचे अवशेष सापडले असून येथे इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून पुढे सलग लोकवस्ती असल्याचा पुरावा मिळाला आहे.

दाते, सु. प्र.