ओकिनावा : नैर्ऋत्य पॅसिफिकमध्ये, जपान व तैवान यांच्या दरम्यान असलेल्या रिऊक्यू द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट. लांबी ९६ किमी., रूंदी १४·५ किमी., क्षेत्रफळ १,१७० चौ. किमी., लोकसंख्या ७,५८,८७७ (१९६५). हे बेट ज्वालामुखीनिर्मित असून डोंगराळ व जंगलयुक्त आहे. मच्छीमारी हो येथील महत्त्वाचा उद्योग त्याशिवाय ऊस, रताळी, बटाटे, भाजीपाला इ. उत्पन्ने व पनामा हॅट, कापड, चिनी मातीची भांडी होतात. नाहा (लोकसंख्या २,५७,१७७) हे येथील प्रमुख शहर कोझा (५५,९२३), इशिकावा (३५,४५३), इतोमान (३४,५७३) ही मोठी शहरे आहेत. दुसऱ्या महायुद्धात ओकिनावा भीषण लढाईचे क्षेत्र होते. १९४५ साली अमेरिकेने बेटावर तिन्ही दलांनिशी हल्ला केला, परंतु जपानच्या कामीकाझे संघटनेने अमेरिकेच्या नौदलाची फार हानी केली. युद्धानंतर बेट अमेरिकेकडेच विश्वस्त प्रदेश म्हणून होते. जपान-अमेरिका करारान्वये १९७२ साली ते पुन्हा जपानला मिळाले आहे.

शाह, र. रू.