बाटूमी : सोव्हिएट संघराज्याच्या जॉर्जिया प्रजासत्ताकातील आजार या स्वायत्त प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या १,१८,॰॰॰(१९७७). हे टिफ्ल्सिच्या पश्चिमेस सु. २५६ किमी. रशिया-तुर्कस्तान सरहद्दीच्या उत्तरेस १५ किमी. अंतरावर, काळ्या समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले आहे. तेलशुद्धीकरण व व्यापार यांसाठी हे विशेष प्रसिद्ध आहे.

प्राचीन काळी ‘बॅथ्यस’, तर मध्ययुगीन काळात ‘व्हॅटी’ या नावाने ते ओळखले जाई. सोळाव्या शतकात हे शहर तुर्कांच्या अंमलाखाली आले. बर्लिन तहानुसार (१८७८) हे रशियाच्या ताब्यात आले. हे मुक्त बंदर राखण्याची बर्लिनच्या तहातील अट मोडून रशियाने तेथे १८८६ सून नाविक तळ उभारला. पहिल्या महायुद्धकाळात (१९१४-१८) रशियाला ते सोडावे लागले. काही काळ त्यावर तुर्कस्तान व ग्रेट ब्रिटन यांचा अंमल होता. १९२१ पासून ते पुन्हा रशियाच्या ताब्यात आले. दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्याला येथे शिरकाव करण्यात यश आले नाही. १९३६ पर्यंत ‘बटूम’ या नावाने ते ओळखले जाई.

बाटूमी हे उद्योगधंद्यांचे केंद्र असून येथील तेलशुद्धीकरण कारखाने महत्त्वाचे आहेत. त्या कारखान्यांसाठी बाकू येथील तेलक्षेत्रापासून नळाद्वारे तेलपुरवठा केला जातो. याशिवाय अन्नप्रक्रिया, जहाजबांधणी, यंत्रसामग्री, विद्युत् साहित्य निर्मिती, फर्निचर इ. उद्योगांचा येथे विकास झालेला आहे. याच्या आसमंतात चहा, तंबाखू, लिंबू, जातीची फळे इत्यादींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. बाटूमी हे बंदर म्हणूनही विख्यात असून येथून खनिज तेल व तद्जन्य पदार्थ, चहा, लोकर, मँगॅनीज इत्यादींची निर्यात केली जाते.

बाटूमी हे आजारचे प्रमुख सांस्कृतिक केंद्र असून तेथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. येथील आरोग्यधामे, शहराच्या उत्तरेस असलेले वनस्पतिउद्यान (१९१२), संग्रहालये इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

लिमये, दि. ह. गाडे, ना. स.