राजपुताना : भारताच्या वायव्य भागातील एक ऐतिहासिक प्रदेश. स्थूलमानाने सांप्रतचे राजस्थान राज्य व राजपुताना एकच. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५६ च्या राज्यपुनर्रचना अधिनियमानुसार राजपुतान्यातील काही भूप्रदेश गुजरात व मध्य प्रदेश राज्यांत समाविष्ट झाला व बाकीचा राजस्थान राज्यातच राहिला. पौराणिक काळात हा प्रदेश ‘पारियात्र मंडल’ अथावा ‘मरूभूमी’ या नावांनी ओळखला जात होता. यांशिवाय याचे मरू, मरूस्थली, मरूधन्व, कुकुर इ. प्राचीन नामोल्लेखही पुराणात आढळतात. महाभारतकाळात याचा उत्तर भाग ‘जांगल देश’ व पूर्व भाग ‘मत्स्य देश’ या नावांनी प्रसिद्ध असल्याचा उल्लेख महाभारतातील वनपर्वात आढळतो. चिनी प्रवासी ह्यूएनत्संग याच्या प्रवासवर्णनात या प्रदेशाचे गुर्जर, वधारी, वैराट व मथुरा असे चार भाग असल्याचे दिसून येते.

राजपूत लोकांच्या वास्तव्यामुळे याला राजपुताना हे नाव पडले. १८०० मध्ये ‘राजपुताना’ या संज्ञेचा वापर जॉर्ज टॉमस या इंग्रज अधिकाऱ्याने प्रथम केल्याचा उल्लेख मिलिटरी मेम्वार्स ऑफ जॉर्ज टॉमस या पुस्तकात आढळतो. प्रसिद्ध इतिहासकार कर्नन टॉड याने १८२९ साली राजपुतान्याच्या ऐतिहासिक वर्णनात मात्र राजस्थान हा शब्दप्रयोग केल्याचे दिसून येते. याला ‘रायस्थान’ असेही म्हणत. या संपूर्ण प्रदेशातील वेगवेगळी राजपूत राज्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखली जात होती परंतु ब्रिटिश सरकारने प्रशासकीय कामकाजासाठी या संपूर्ण प्रदेशाला एकत्रितपणे ‘राजपुताना’ हे नाव रूढ केले (१८०० ते १९४७). स्वतंत्र भारतात हा प्रदेश १९५६ पासून राजस्थान राज्य म्हणून ओळखला जाऊ लागला. [⟶राजपुतांचा इतिहास राजस्थान राज्य].

चौंडे, मा.ल.