हजारीबाग : भारताच्या झारखंड राज्यातील शहर व याच नावाच्या जिल्ह्याचे आणि उत्तर छोटा नागपूर या प्रादेशिक विभागाचे मुख्यालय. लोकसंख्या १७,३४,००५ (२०११). राष्ट्रीय महामार्गाने ते रांची, धनबाद, रामगढ इ. तसेच इतर राज्यातील महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले आहे.हजार बागांचे शहर अशी या शहराच्या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते.

हजारीबागचा प्रदेश पूर्वी अत्यंत घनदाट व दुर्गम जंगलाने व्यापलेला होता. छोटा नागपूर पठारावरील याच्या परिसरात पूर्वीपासून आदिवासी जमातींचे वास्तव्य होते. १५५६ मध्ये हा प्रदेश अकबर बादशाहाच्या साम्राज्यात होता. तेव्हापासून येथे मुस्लिमांचा अंमल सुरू झाला.तो अंमल थेट ब्रिटिशांचा भारतावर एकछत्री अंमल सुरू होईपर्यंत होता. १७९० मध्ये हजारीबाग ब्रिटिश लष्करी छावणीचे शहर बनले. १८३४ मध्ये ते रामगढ जिल्ह्याचे मुख्यालय बनले. १८६९ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. १८८४ पर्यंत या शहराचा छावणी म्हणून विकास होत गेला. त्यामुळेच हजारीबागला सुनियोजित शहराचे स्वरूप प्राप्त होऊ शकले.

हजारीबाग हे कोळसा साठ्यांसाठी प्रसिद्ध आहे. झारखंडमधील हे दुसऱ्या क्रमांकाचे कोळसा खाणीचे क्षेत्र आहे. त्यामुळे येथे कोळसा खाण उद्योग महत्त्वाचा आहे. येथे कोल इंडिया लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सेंट्रल कोलफिल्ड्स ही दुय्यम कंपनी कोळसा उत्पादनाचेकाम करते. या कोळशावर आधारित औष्णिक ऊर्जा निर्मितीचे कामयेथे सुरू आहे. शहरापासून १० किमी. अंतरावर नॅशनल थर्मल पॉवरसेंटर टाउनशिपची उभारणी केली जात आहे. दामोदर खोरे महामंडळाची अनेक काऱ्यालये हजारीबाग येथे आहेत.

ट्रिनिटी कॉलेज (१८९०), सेंट कोलंबस कॉलेज, विनोबा भावे विद्यापीठ इ. शैक्षणिक संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत. पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि सीमा सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्र इ. येथे आहेत.

बरसो पाणी लेणी, बुधवा महादेव मंदिर, कान्हेरी पर्वत, हजारीबाग राष्ट्रीय उद्यान, कोनार धरण, नरसिंह मंदिर, पंचमंदिर, तिलैया धरण, हजारीबाग सरोवर, सूरजकुंड उष्णोदकाचे झरे इ. हजारीबाग शहराच्या परिसरातील स्थळे पर्यटकांची आकर्षणे आहेत.

चौधरी, शंकर रामदास