कँडी : श्रीलंकेच्या सेंट्रल प्रांताची राजधानी व हवा खाण्याचे ठिकाण. लोकसंख्या ७८,०००(१९६८). प्राचीन काळात ही श्रीलंकेची राजधानी होती. १८१५ मध्ये ही ब्रिटिशांनी घेतली. कोलंबोच्या ईशान्येस हे १२० किमी आहे. समुद्रसपाटीपासून ४८५ मी. उंचीवरील व भोवताली वनाच्छादित पर्वतराई असलेले हे शहर कँडीच्या पठारावर वसलेले आहे. कँडीच्या राजाने १८०६  मध्ये बांधलेल्या सुंदर तलावाच्या काठावरील हे स्थान भगवान गौतम बुद्धाच्या पवित्र दाताचा अवशेष  असलेल्या ‘दलद मलिगव’ या मंदिरामुळे पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. हा दात चौथ्या शतकात येथे  आणला गेला असा समज आहे. पोर्तुगीजांनी मंदिराचा नाश करण्याचा प्रयत्न केला होता. या  मंदिरामुळे आणि येथे दर वर्षी होणाऱ्या धार्मिक उत्सवामुळे ‘कँडी’ नृत्यकलेला वाव मिळून ती कला समृद्ध झाली आहे. पाली व संस्कृत भाषांतील प्राचीन हस्तलिखितेही येथे सापडली आहेत. पेरादेनिय या कँडीच्या उपनगरात सीलोन विद्यापीठ व रॉयल बोटॅनिकल गार्डन असून पूर्वीच्या राजांचे  राजवाडे, ग्रंथालय, संग्रहालय व इतर वास्तूंचे अवशेषही ह्या भागात आढळतात. कँडीच्या परिसरात होणाऱ्या चहा, तांदूळ, रबर व सुपारी यांमुळे हे व्यापारी केंद्रही बनले आहे.

दिवाकर, प्र. वि.