निंगपो : निंगशिएन. चीनच्या जजिआंग प्रांतातील एक शहर व हांगजो उपसागरातील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ३,५०,००० (१९७० अंदाज). हे शांघायच्या दक्षिणेस १९३ किमी. व हांगजोच्या पूर्व आग्नेयीस १४५ किमी.वर युंग (निंगपो) नदीच्या मुखापासून २५ किमी. आत युंग, फंग्‌ह्‌वा, यूयाऊ या नद्यांच्या संगमाजवळ वसले आहे. हे दळणवळणाचे केंद्र असून लोहमार्गाने हांगजो आणि शांघायशी जोडले आहे. चीनचे धार्मिक व सांस्कृतिक केंद्र असून मिंग राजवटीत हे चिंगयूआन या नावाने ओळखले जात होते. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांचे येथे आगमन झाले, तर ब्रिटिशांचे सतराव्या शतकात. अफूच्या युद्धात हे ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. १८४२ मध्ये नानकिंगच्या तहाने हे पाश्चात्त्य व्यापारासाठी खुले करण्यात आले. जपान–चीन युद्धात (१९४१–४५) हे जपानच्या ताब्यात होते.

चीनचे व्यापारी, औद्योगिक व महत्त्वाचे मच्छीमारी केंद्र म्हणून हे प्रसिद्ध असून १९४९ पासून येथे औद्योगिकीकरणास सुरुवात झाली आहे. येथे साबण, डीझेल एंजिने, शेतीची व इतर अवजारे, जहाजबांधणी इ. कारखाने आहेत. येथून परदेशांशी व्यापार चालत असला, तरी स्वदेशी व्यापारच महत्त्वाचा असून चहा, फर्निचर, मासे, कापूस यांची शेजारील जिल्ह्यांत निर्यात होते, तर साखरेची आयात केली जाते.

गाडे, ना. स.