रायपूर : मध्य प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३,३८,९७३ (१९८१). हे दुर्गच्या पूर्वेस ३५ किमी. वर बिलासपूरच्या दक्षिणेस ११० किमी. अंतरावर आहे. दक्षिण-पूर्व लोहमार्गावरील हे महत्त्वाचे प्रस्थानक असून, येथूनच नागपूर, विशाखापटनम्, विजयवाडा, जमशेटपूर या शहरांकडे लोहमार्ग जातात. त्यांशिवाय काही स्थानक ठिकाणांशी रायपूर अरुंदमापी लोहमार्गाने जोडलेले आहे. नवव्या शतकात हे नगर अस्तित्वात आल्याचे सांगितले आहे. परंतु सांप्रतच्या नगराची स्थापना चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात रत्नपूरचा राजा रामचंद्र याने करून ती आपल्या राज्याची राजधानी केली. येथे आढळलेल्या १४०२ च्या शिलालेखात रामचंद्रानंतर गादीवर आलेल्या राजा ब्रह्मदेवाचा उल्लेख आढळतो. येथील किल्ल्याच्या (१४६०) दोन बाजूंस दोन मोठे तलाव असून किल्ल्यात बरीच भग्न मंदिरे आहेत. रायपूर-छत्तीसगढ विभागाचे १८१८ मध्ये हे मुख्य ठिकाण होते. येथे नगरपालिकेची १८६७ मध्ये स्थापना झाली.

रायपूर हे प्रमुख औद्योगिक आणि व्यापारी केंद्र आहे. येथे एक औद्योगिक वसाहत असून अन्नप्रक्रिया, लाकूड कापणी, लाकडी सामान, भात सडणे, तेलगिरण्या, पितळी वस्तू, लहान लोखंडी सामान, हातमागावरील कापड, कापूस वटणी, रेडिओचे सुटे भाग, बिडी, प्लॅस्टिक आणि कागदी पिशव्या, सोन्या-चांदीचे दागिने, छपाईकाम, ॲल्युमिनियमनिर्मिती इ. उद्योगधंदे चालतात. रायपूर येथे प्रायोगिक तत्त्वावर रेशमी किड्यांची पैदास केली जाते. १८७५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘महंत घासिदास मिमॉरिअल म्यूझीयम’ मध्ये प्राचीन वस्तू, मूर्ती, शिल्पकला, नाणी, प्रकृतिविज्ञान आणि मानवशास्त्रविषयक बाबींचा संग्रह आहे. शहरात इतर आरोग्यसुविधांबरोबरच क्षयरोग चिकित्सा व कुष्ठरोग निर्मूलन केंद्रही आहे. येथे दोन संगीत अकादमी आहेत. शहरात ⇨रविशंकर विद्यापीठ (१९६४) आहे. शहरात दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला जत्रा भरते.

चौधरी, वसंत