साखरवाडी : महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील एक गाव. लोकसंख्या २०,००० (२००१). साखरवाडी फलटणच्या ईशान्येस १५ किमी.तर सातारच्या वायव्येस सु. ६० किमी. वर असून लोणंद-फलटण रस्त्यावरील बडेखाननामक थांब्यापासून उत्तरेस ६ किमी. वर आहे. पूर्वी साखरवाडी भागाचा समावेश फलटण संस्थानातील होळ गावामध्ये होत असे. साखरवाडी म्हणजे साखरेचे गाव. उद्योजक लक्ष्मणराव आपटे यांनी अमाल्गमेशन ही कंपनी स्थापन करून येथील काही हेक्टर ओसाड जमीन खरेदी करून ती विकसित केली आणि त्या ठिकाणी १९३३ मध्ये फलटण शुगर वर्क्स हा जिल्ह्यातील पहिला आधुनिक साखर कारखाना स्थापन केला. १९३७-३८ मध्ये या कारखान्यात ५०,८५,१९१ रुपये एवढी गुंतवणूक करून २०,२०,९८९ रुपये किमतीची ९१,९४३ पोती, तर १९४६-४७ मध्ये ९४,९०,६२५ रुपये गुंतवणूक करून ४६,१९,१६२ रुपये किमतीची ७९,६२० पोती इतके साखरेचे उत्पादन केले. सन १९५७-५८ साली या कारखान्याची प्रतिदिन गाळपक्षमता ८०० ते १,००० मे. टन होती. साखर कारखान्याशी निगडित काही व्यवसाय येथे सुरू करण्यात आले. त्यांत कॅडबरी-चॉकलेट निर्मिती महत्त्वाची आहे. १९८५ मध्ये या कारखान्याचे सहकारी तत्त्वावरील कारखान्यात रूपांतर करण्यात आले.

या कारखान्यामुळे साखरवाडीत हायस्कूल, वाचनालय, क्रीडांगण, जिमखाना, रुग्णालय, दवाखाने, गुरांचा दवाखाना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, बँका वगैरे सुविधा आल्या आहेत.

देशपांडे, सु. र.