अजयगढ : मध्य प्रदेश राज्याच्या पन्ना जिल्ह्यातील तहसिलीचे ठिकाण व पूर्वीच्या अजयगढ संस्थानची राजधानी. लोकसंख्या ६,०३१ (१९७१). प्राचीन नाव जयपुरदुर्ग. कैमूर पर्वतश्रेणीपैकी, केदार डोंगरावर समुद्रसपाटीपासून ५३२ मी. व जमिनीपासून २६२ मी. उंचीच्या कड्यावर नवव्या शतकात बांधलेला अजयगढ हा किल्ला असून त्याच्या पायथ्याशी हे गाव वसले आहे. अजयगढ किल्ल्यास तिकोनी कोट व पाच दरवाजे (पैकी दोन सुस्थितीत) आहेत वर पाण्याची टाकी, खजुराहो शैलीची तीन पडीक जैनमंदिरे व ११४१ ते १३१५ दरम्यानचे चंदेल राजांचे शिलालेख आहेत. साग व तेंदू ह्या झाडांच्या विपुलतेमुळे दुर्ग व आसपासचा प्रदेश शोभिवंत दिसतो. उत्तर रेल्वेच्या झाशी-माणिकपूर मार्गावरील बांदा व बदौसा ह्या स्थानाकांपासून सडकेने अजयगढला जाता येते. बांद्यापासून अजयगढ ५५ किमी. दक्षिणेस आहे.

ओक, शा. नि.