जनकपूर : नेपाळमधील एक तीर्थक्षेत्र, प्राचीन मिथिला, तीर-भुक्ती, विदेह किंवा विदेहनगर ते हेच. शिवधनुर्भंग करून रामाने सीता मिळविली ती येथेच. बुंदेलखंडाच्या राणीने बांधलेले सुंदर जानकीमंदिर येथे आहे. त्याच्या भोवती जनक, राम, लक्ष्मण, हनुमान यांची मंदिरे आहेत. जवळच गंगासागर सरोवर आहे. येथे रामनवमीला मोठा उत्सव होतो. जनकपूर सभोवती शिलानाथ, कपिलेश्वर, कूपेश्वर, कल्याणेश्वर, इ. शिवमंदिरे आहेत. बिहारमधील दरभंगा स्थानकापासून मधुबनीवरून नेपाळ–बिहार सीमेजवळच्या जयनगरपर्यंत आणि तेथून पुढे जनकपूरपर्यंत लोहमार्गाने जाता येते. जनकपूरपासून काठमांडूपर्यंत नेपाळ एअरवेजची विमाने जातात.

कांबळे, य. रा.