तिलबर्ग : नेदर्लंड्‌सच्या दक्षिण भागातील नूर्ड (नॉर्थ) ब्राबांट प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,५४,५१२ (१९७२). हे व्हिल्हेल्मीन कालव्यावर वसले असून ब्रेडाच्या पूर्वेस सु. २१ किमी. आहे. कापड विणणे हा येथील महत्त्वाचा उद्योग आहे. १८६० पर्यंत हे एक लहान खेडे होते पण विविध उद्योगधंदे, वीज निर्मिती व लोहमार्गाची सोय यांमुळे याचा औद्योगिक विकास झाल्याने दक्षिण भागातील औद्योगिक केंद्रांत याची गणना होते. येथे कापड संशोधन केंद्र व रोमन कॅथलिक इकॉनॉमिक युनिव्हर्सिटी, रूपण व इतर कलाविषयक अकादमी या प्रसिद्ध संस्था आहेत. यंत्रे, पुठ्ठे, रसायने, रंग, चर्मोद्योग हेही येथील इतर महत्त्वाचे उद्योग आहेत. नगरभवन, डी एफ्तेलिंग उद्यान ही येथील प्रेक्षणीय स्थळे आहेत.

ओक, द. ह.